प्रेस मीडिया वृत्तसेवा :
सांगली : ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य धोका टाळण्यासाठी 18 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी पहिला व दुसरा दोन्ही डोस गरजेचा आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या महालसीकरण अभियानात 90 हजारावर नागरिकांनी लस घेतली.शुक्रवारीही महालसीकरण अभियान सुरु राहणार असून ज्यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस कालावधी संपूणही अद्याप घेतला नाही त्यांनी तसेच ज्यांनी अद्यापही कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेला नाही, त्यांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी केले.बहुतांशी देशांमध्ये ओमीक्रॉनने शिरकाव केला आहे. त्याला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात महालसीकरण अभियान राबवले जाईल.
कोविड-19 लसीकरण अभियानामध्ये 4 लाखाहून अधिक नागरिक दुसर्या डोससाठी पात्र आहेत. तसेच पात्र असूनही अद्याप कोरोना लसीचा एकही डोस न घेतलेले जवळपास 15 टक्के नागरिक आहेत. त्यांच्यासाठी महालसीकरण अभियान राबविण्यात सुरु आहे. लसीकरण अभियानासाठी जिल्ह्यात 450 हून अधिक लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. शहरी भागासह ग्रामीण भागातही लसीकरण केंद्रावर अनेकांनी उत्स्फूर्तपणे लस घेतली. गुरुवारी 90 हजाराहून अधिक जणांनी लस घेतली. कोरोनाच्या तिसर्या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी, कोरोना होवू नये अथवा झाल्यास त्याचा गंभीर प्रतिकूल परिणाम होवू नये यासाठी कोरोना लसीचे दोन्ही डोस अनिवार्य आहे.
महानगरपालिकेचे काही प्रभाग, जत, आटपाडी, खानापूर या तालुक्यातील लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. ज्या भागात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. तेथे शिक्षक, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत लसीकरणासाठी प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्याला लसीकरण मोहिमेसाठी कोविशिल्डचे साडेचार लाख डोसेस तर कोव्हॅक्सिनचे लाखावर डोस मिळाले आहेत. अभियानाव्दारे पहिला आणि दुसरा डोसचे चार लाखाचे उद्दिष्ट आहे. शुक्रवारीही महालसीकरण सुरु राहणार आहे. त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी पात्र नागरिकांनी या मोहिमेत प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले.