निधीच्या पूर्ततेनंतर वैद्यकीय देयके देणार - नामदार अनिल परब यांचे आश्वासन
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
राज्यातील एसटी कामगारांचा संप दीर्घकाळ चालला असून त्यांच्या न्यायिक हक्कासाठी संपकऱ्यांना आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाठिंबा दिला. इतकेच नव्हे तर सध्या मुंबईत सुरु असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी प्रश्न मांडून कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळण्याबाबत आणि वैद्यकीय देयके मिळण्याबाबत आवाज उठविला.
यावेळी सभागृहात बोलताना एसटी कमर्चाऱ्यांना न्याय देण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली. विलनीकरणाच्या मुद्यावर संप दीर्घकाळ चालला आहे. त्याच्यापाठी प्रमुख मागण्या पगारवाढ, त्याचबरोबर वैद्यकीय बिलाची प्रतिपूर्ती होती. या संदर्भात राज्य सरकारकडून निधी उपलब्ध होईल तसे अदा केले जाईल असे उत्तर दिले असून वेतनवाढ ठराविक कालावधीने सातत्याने झाली पाहिजे. तसेच वैद्यकीय बिलांची पूर्तता करण्यासाठी शासनाकडून स्थायी स्वरूपाची व्यवस्था झाली पाहिजे अशी मागणी करतानाच, कर्मचाऱ्यांची एसटीचे विलनीकरणाची मागणी ठाम आहे. या संदर्भात शासन शासन काय करणार आहे, असा सवाल विधानसभेत आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केला. त्यामुळे कर्मचाऱ्यांना १० तारखेच्या वेतन देण्याचे आश्वासन परिवहन मंत्री अनिल परब यांनी देतानाच निधीची पूर्तता होताच वैद्यकीय बिलांचा विषय मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले.
सभागृहात उत्तर देताना परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले कि, एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित होत नव्हता. आता राज्य शासनाने दरमहा १० तारखेच्या आत वेतन करण्याची जबाबदारी घेतली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये एसटीच्या उत्पन्नात प्रचंड नुकसान झाले आहे. १२ हजार कोटींचा संचित तोटा असताना यावर्षी संपामुळे ६५० कोटी रुपयांचा आमचा नुकसान झाला आहे. जो कराराचा भाग आहे तो आम्ही पूर्ण केला असून वैद्यकीय बिलांच्या बाबतीत निधीची मागणी झाली आहे. निधीची पूर्तता झाल्यावर ताबडतोब बिलांचा विषय प्राथमिकतेने घेतला जाईल.