आमदार प्रशांत ठाकूर यांची शासनाकडे मागणी ..
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
मुंबई पुणे महामार्गावर वारकरी दिंडीत टेम्पो घुसून झालेल्या अपघातातील मृत्यूमुखी पडलेल्या पाच महिलांना तसेच २० जखमी वारकरींना तातडीने शासकीय आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगडचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, मुंबई - पुणे महामार्गावरील सातेफाटा येथे आळंदीला चाललेल्या रायगड जिल्ह्यातील माऊली कृपा चॅरीटेबल ट्रस्टच्या दिंडीत टेम्पो घुसून पाच वारकरी महिलांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जण गंभीर झाले. अपघात होऊन जवळपास १२ ते १३ दिवसांचा कालावधी होऊनही या अपघातग्रस्तांना शासनाकडून अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळाली नसल्याचे सदर विभागातील ग्रामस्थांकडून मला समजले आहे. वास्तविक पहाता वारकरी दिंडीतील अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळणे आवश्यक असताना १२ ते १३ दिवसांचा कालावधी होऊनही शासनाकडून आर्थिक मदत न मिळाल्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा गांभीर्याने विचार करता अपघातग्रस्तांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे.