दिव्यांग व स्वमग्न मुलांच्या विकासासाठी समाजातील संवेदना जागृत झाली पाहिजे - आमदार अतुल भातखळकर

  सोपान संस्थेचे निर्भयपणे काम - आमदार प्रशांत ठाकूर



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

 दिव्यांग व स्वमग्न मुलांच्या विकासासाठी समाजातील संवेदना जागृत झाली तरच खऱ्या अर्थाने त्यांच्या उत्कर्षाचे काम होईल, असे प्रतिपादन आमदार अतुल भातखळकर यांनी आज (दि. ०५) खांदा कॉलनी येथे केले. सोपान संस्थेच्या शनय ऑटिझम रिसोर्स सेंटरचे उद्घाटन कांदिवली विधानसभा मतदार संघाचे आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष व पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. 

           या कार्यक्रमास सोपान संस्थेच्या विश्वस्त रुबिना लाल, शोभा श्रीवास्तव, व्यवस्थापकीय विश्वस्त संगिता मेहता, कोटक बँकेच्या सीआरएस विभागाचे उपाध्यक्ष हिमांशू निवसरकर,  स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती सभापती समीर ठाकूर, नगरसेवक मनोहर म्हात्रे, नगरसेवक एकनाथ गायकवाड, नगरसेविका सिता पाटील, युवा नेते भीमराव पोवार, अभिषेक भोपी, यांच्यासह पालक, विद्यार्थी उपस्थित होते. 

        आमदार अतुल भातखळकर यांनी पुढे म्हंटले कि, दिव्यांग, स्वमग्न यांच्या बाबतीत कायदे, नियम अंमलात आले पाहिजेत, त्यासाठी प्रशासनाचा पुढाकार महत्वाचा ठरणार असून स्थानिक स्वराज्य संस्थेने किमान तीन टक्के निधी दिव्यांगांच्या विकासासाठी खर्च केलाच पाहिजे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. स्वमग्न किंवा दिव्यांग असलेल्या मुलांच्या पालकांची व्यथा मोठी आहे, सतत चिंतेत त्यांचे आयुष्य असते. स्वमग्न, दिव्यांग वर्गाचे प्रश्न खूप आहेत, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या जीवनाची घडी विस्कळीत झालेली असते अशा परिस्थितीत सोपान सारखी संस्था पुढे येऊन त्यांना धीर देत आहे आणि हि बाब अत्यंत कौतुकास्पद आहे. दिव्यांगांच्या गरजा ओळखून त्यांची काळजी घेतली पाहिजे, यासाठी पंतप्रधान पदाची धुरा हाती घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या वास्तूमध्ये दिव्यांगांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले त्यामुळे दिव्यांगांना मोठा दिलासा मिळाला आहे. चांगली धारणा असलेले व्यक्तीमत्व म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांची ओळख आहे. मी या संस्थेचा हितचिंतक असलो तरी आमदार प्रशांत ठाकूर यांची मदत या संस्थेला उपयुक्त ठरणार आहे, असेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. आणि यापुढे आम्ही दोघे या संस्थेच्या आणि दिव्यांग व स्वमग्न मुलांच्या विकासासाठी काम करत राहू, असेही त्यांनी नमूद केले. 

         यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी बोलताना, प्रथम संस्थेच्या वास्तूचे आणि कार्याचे कौतुक केले. सोपान संस्थेच्या माध्यमातून समाजाला प्रेरणा देण्याचे काम होत असून देवाचे आशिर्वाद या संस्थेच्या पाठीशी आहे त्यामुळे वेळोवेळी या संस्थेला हितचिंतकांचा पाठिंबा मिळाला आहे. दुर्देवाने ज्या मुलांना स्वमग्न व्याधीने जडली आहे, त्यांच्या कुटुंबाची आर्थिक आणि मानसिक परिस्थिती बिकट होते, त्यांना आधाराची मोठी गरज असते. त्यांना सामान्य जीवन जगण्यासाठी हि संस्था काम करीत आहे. या केंद्रातून स्वमग्न मुलांच्या विकासासाठी मोठी मदत होणार आहे, त्यामुळे हे केंद्र पाल्य आणि पालक यांच्या दृष्टिकोनातून महत्वाचे ठरणार आहे. आमदार अतुल भातखळकर नेहमी मदतीसाठी आग्रही असतात. त्याप्रमाणे त्यांनी या संस्थेच्या विकासासाठी कायम मदत केली आहे, असे सांगतानाच संस्थेची निर्भयपणे वाटचाल सुरु असून त्यांचे काम अधिक व्यापक होण्यासाठी आमच्याकडूनही शक्य होईल तेवढी संस्थेला मदत करू, असेही त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post