प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
महाराष्ट्राच्या आरोग्य खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, 24 नोव्हेंबर 2021 रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेल्या 33 वर्षीय तरुणामध्ये ओमिक्रॉन हा व्हेरियंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे.
"हा तरुण कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असून त्याने कोणतीही कोव्हिड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. 24 नोव्हेंबर 2021 रोजी या प्रवाशाला सौम्य ताप आला. त्याला इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे या रुग्णाचा आजार एकूण सौम्य स्वरूपाचा असून तो सध्या कल्याण डोंबिवली येथील कोव्हिड केअर सेंटर मध्ये उपचार घेत आहे." अशी माहिती आरोग्य खात्याकडून देण्यात आलीय.
संपर्कातील बहुतांशजण निगेटिव्ह तसंच, या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 35 जणांचा शोध घेण्यात आला असून, हे सर्वजण कोव्हिड निगेटिव्ह आढळले आहेत.या शिवाय या तरूणाने दिल्ली ते मुंबई हा प्रवास ज्या विमानाने केल्यानं त्या विमान प्रवासातील 25 सहप्रवाशांची देखील तपासणी करण्यात आली आहे. यापैकी सर्वजण कोव्हिड निगेटिव्ह आढळलेले आहेत. याशिवाय संपर्कात आलेल्या आणखी काही जणांचा शोध घेण्यात येत आहे.
या दरम्यान झांबिया देशातून पुण्यात आलेल्या 60 वर्षीय पुरुषाच्या जनुकीय तपासणीचा अहवालही राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून प्राप्त झाला असून या रुग्णामध्ये ओमिक्रॉन आढळलेला नाही. मात्र डेल्टा सबलिनिएज विषाणू आढळून आलेला आहे.
आज (4 डिसेंबर) सकाळपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अति जोखमीच्या देशातून आलेल्या सर्व 3 हजार 839 प्रवाशांची RTPCR तपासणी करण्यात आली असून इतर देशांमधून आलेल्या 17 हजार 107 प्रवाशांपैकी 344 प्रवाशांची RTPCR तपासणी करण्यात आली आहे.
मुंबई विमानतळावरील तपासणीत 1 डिसेंबरपासून आतापर्यंत 8 प्रवासी कोविड बाधित आढळले असून त्यांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याशिवाय राज्यात 1 नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे.
विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगीकार करावा, नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करुन भारतात आले आहेत त्यांनीही आपल्याबाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने सर्व जनतेला करण्यात आले आहे.
गुजरातमध्ये आढळला ओमिक्रॉनचा एक रुग्ण गुजरात मधील जामनगरमध्ये ओमिक्रॉनचा एक रुग्ण आढळला आहे. गुजरातमधील हा ओमिक्रॉनचा पहिलाच रुग्ण आढळला असून, हा रूग्ण झिम्बाब्वेमधून परतला होता.या रुग्णाची चाचणी करून त्याचे नमुने पुण्याला पाठवण्यात आले आहे.
गुजरातचे आरोग्यमंत्री मनोज अग्रवाल अगरवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, "ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णाला अलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं असून, तो ज्या भागात राहतो तिथं कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आलंय. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्याचं काम सुरू आहे."
जामनगरमधील या रूग्णामुळे ओमिक्रॉनचे भारतातील रूग्णांची संख्या तीनवर पोहोचलीय.या आधी कर्नाटकातील बंगळुरूत ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले होते. हे रुग्ण दक्षिण आफ्रिकेतून परतले होते.
महाराष्ट्रात विदेशातून आलेले 9 प्रवासी पॉझिटिव्ह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत परदेशातून आलेले 25 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत.आरोग्य विभागाच्या माहितीनुसार या प्रवाशांच्या संपर्कात असलेल्या 3 लोकांना कोरोनाची लागण झालीये.कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशांना कोरोनाच्या कोणत्या व्हेरियंटचा संसर्ग झालाय हे शोधण्यासाठी जिनोम सिक्वेंसिंग करण्यात येणार आहे.यातील 12 नमुने पुण्याच्या NIV मध्ये तर 16 नमुने मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात तपासणी पाठवण्यात आले आहेत.
मुंबंई महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे सांगतात, "2 डिसेंबरला एअरपोर्टवर 485 लोकांची चाचणी करण्यात आली. यात 9 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं."