मुख्यमंत्र्याविना लोकशाही असा प्रकार

 मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरे वर निशाणा.

प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

 आजपासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  गैरहजर आहेत. त्यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. यावरूनच भाजप आमदार आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार  यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्याविना लोकशाही असा प्रकार आज पाहिला असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

आज अधिवेशनाचा पहिला दिवस असल्याने मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहतील असे वाटले होते. अमेरिकेत चालकाशिवाय गाडीचा शोध लागला आहे. पण, मुख्यमंत्र्याविना लोकशाही असा प्रकार आज पहिल्यांदा पाहिला आहे, असं मुनगंटीवार म्हणाले. तसेच हे अधिवेशन मराठवाडा आणि विदर्भावर अन्याय करणारे आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेण्यात आलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला ऑनलाइन उपस्थिती दर्शवली होती. त्यावरून देखील सुधीर मुनगंटीवारांनी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी चहापानावर आमच्या सारखा बहिष्कार टाकला, असं मुनगंटीवार म्हणाले. तसेच मुंबई महापालिकेच्या जाहिरातीवार महापौरांचा फोटो हवा होता. मात्र, मुख्यमंत्र्यांचा फोटो छापण्यात आला. आता राज्य सरकारच्या जाहिरातींवर शरद पवारांचा फोटो वापरावा, असा टोला देखील मुनगंटीवारांनी लगावला.

पंतप्रधान संसदेच्या अधिवेशनात का उपस्थित नाहीत..? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला होता. तसेच त्यांनी भाजपवर देखील टीका केली होती. त्यावरून मुनगंटीवारांनी पटोलेंना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री मंत्रालयात येऊ शकत नाहीत आणि नाना म्हणतात पंतप्रधान यांनी राजीनामा द्यायला हवा, असं म्हणतात. काय तर्क लावतात माहिती नाही, असं मुनगंटीवार म्हणाले.



Post a Comment

Previous Post Next Post