क्राईम न्यूज : माथेरान इथे ' त्या ' शीर नसलेल्या महिलेची ओळख पटली

मुंबईतील गोरेगाव येथील पुनम पाल या महिलेची हत्या झाली असल्याचं उघड ..

प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील   

माथेरान मध्ये एका खोलीत महिलेचा मृतदेह आढळला होता. पण या मृतदेहाची ओळख पटली नव्हती. या घटनेनंतर मोठी खळबळ माजली होती. परंतु, आता या महिलेची ओळख पटली असून मुंबई तील गोरेगाव येथील पुनम पाल या महिलेची हत्या झाली असल्याचं उघड झालं आहे. तर हत्या करणाऱ्या संशयित आरोपीला रायगड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

शनिवारी संध्याकाळच्या सुमारास एक तरुणी आणि तरुण हे माथेरान येथे फिरायला आले होते. त्यावेळेस, त्यांनी इंदिरानगर येथील एका घरातील खोलीमध्ये वास्तव्य करीत रुबिना बेन आणि अमजद खान, असं खोटं नाव सांगून अंबरनाथ येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात आलं होतं.

दरम्यान, रविवारी सकाळी त्यांच्या खोलीचे दार उघडं असल्यानं साफसफाईसाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला खोलीतील दिवाणाखाली महिलेचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. या घटनेची माहिती त्यानं पोलिसांना देताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यावेळी या मृतदेहाचं डोकं कापण्यात आल्याचं आढळून आलं होतं. यामुळे, पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवित महिलेची ओळख पटवण्याचं काम सुरु केलं. तपासादरम्यान, घटनास्थळापासून काही फुटांच्या अंतरावर झुडपामध्ये एक बॅग आढळून आली असता, त्यामध्ये दवाखान्याच्या एका चिठ्ठीवर मुंबईतील गोरेगाव येथील पत्ता आढळून आला होता.

माथेरान येथील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने महिला आणि तिच्यासोबत असलेल्या तरुणाचा फोटोही मिळवण्यात आला होता. यावरून, पोलीसांनी मुंबईतील गोरेगाव येथील पोलीस ठाण्यामध्ये चौकशी केली असता पुनम पाल ही महिला गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याचं निष्पन्न झालं. यावरून, पुढील तपास केला असता पुनम पाल ही तरुणी नवऱ्याला भेटण्यासाठी गेली असल्याची माहिती मिळाली होती. या अनुषंगाने तपास केला असता माथेरान येथे हत्या करण्यात आलेल्या तरुणीसोबत असलेला तरुण हा तिचा नवरा असल्याचं निष्पन्न झालं होतं. यावरून, पुनम पाल हिच्या नवऱ्याचा शोध घेतला असता त्याला पनवेल येथून ताब्यात घेण्यात आलं आहे.

दरम्यान, गेल्या सात महिन्यांपूर्वी मे 2021 मध्ये लग्न झालेल्या पुनम पाल हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची हत्या करण्यात आली असल्याची शक्यता पोलिसी सुत्रांकडून वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, आरोपी पतीकडून पत्नीच्या मृतदेहाचे कापलेले शीर मिळवून ताब्यात घेण्याचा प्रयत्न रायगड पोलीस करत आहे. तर, माथेरान येथे हत्या करण्यात आलेल्या पूनम पाल हिच्या हत्येच्या तपासासाठी रायगड पोलिसांची पाच पथकं तयार करण्यात आली आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post