खासगी अस्थापना व नागरिक अद्यापही हवे तसे दक्ष व सजन नसल्याचे निष्पन्न
प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे : दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना केंद्रीय व राज्य तपास यंत्रणांकडून वेळोवेळी अलर्ट मिळत असतात. या अलर्टच्या पार्श्वभूमीवर खासगी व सरकारी अस्थापना तसेच नागरिक किती अलर्ट आहेत याची तपासणी पोलिसांकडून वेळो वेळी केली जाते.या साठी अनेकदा मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात येते. भारती विद्यापीठ पोलिसांनी अशाच प्रकारे दोन ठिकाण मॉक ड्रीलचे आयोजन केले होते. या मध्ये एका खासगी अस्थापनेने अक्षम्य निष्काळजीपणा दाखवला तर दुसऱ्या एका अस्थापनेने दक्षता दाखवली मात्र योग्य ती काळजी घेतली नाही. यावरुन खासगी अस्थापना व नागरिक अद्यापही हवे तसे दक्ष व सजन नसल्याचे निष्पन्न झाले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली हद्दीतील डी मार्ट आणि ऑरा हॉस्पिटलमध्ये मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भारती विद्यापीठ परिसरातील ऑरा हॉस्पिटमध्ये रिसेप्शन काऊंटरच्या समोर एक डमी बॅग ठेवण्यात आली होती. काही पोलीस कर्मचारी रुग्ण असल्याचे भासवत चौकशी करण्यासाठी रुग्णालयात गेले होते. तेव्हा सोफ्यावर बसलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी ही डमी बॅग तेथे ठेवली होती. यानंतर एक कर्मचारी बाहेर थांबून बॅगेवर लक्ष ठेऊन होता. तासभर झाला तरी बॅगकडे हॉस्पिटलमधील कोणाचेच लक्ष गेले नाही.
तासाभराने तेथील महिला सुरक्षा रक्षकाला ही बाब कोणीतरी लक्षात आणून दिली. तीने ती बॅग तशीच उचलून बाहेर आणून ठेवली. तीने बॅगे संदर्भात वरिष्ठांना तसेच पोलिसांना कळवले नाही. पोलिसांकडून अस्थापनांना वारंवार सूचना व मार्गदर्शन करुनही त्याकर्ड दुर्लक्ष होत असल्याचेच हे उदाहरण होते. पोलीस आता लेखी स्वरुपात अस्थापनांना सूचना देणार आहेत. तर दुसरा डेमो दत्तनगर येथील डी मार्ट समोर करण्यात आला. तेथे प्रवेशव्दाराच्या बाहेर एक डमी बॅग ठेवण्यात आली. त्यामध्ये बॅटरी, वायर अशा संशयास्पद वस्तू भरल्या होत्या.
साधारण तासाभराने तेथील सुरक्षा रक्षकाचे बॅगेकडे लक्ष गेले. त्याने नागरिकांना विचारणा केली यानंतर व्यवस्थापकाला कल्पना दिली. व्यवस्थापनाने तातडीने पोलीस नियंत्रण कक्ष आणि स्थानिक चौकीला फोन केला. पोलीस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाल्यावर त्यांनी बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण केले. त्यांनी बॅगेची तपासणी केल्यावर धोकादायक काहीच नसल्याचे सांगितले.
यामध्ये डी मार्ट व्यवस्थापनाने पोलिसांना कल्पना दिली असली तरी योग्य ती खबरदारी घेतली नाही. संशयास्पद बॅग आढळल्यावर त्यांनी परिसर रिकामा करणे आवश्यक होते. मात्र तसे केले गेले नाही. बॅगेजवळून नागरिकांची ये जा सुरु होती. यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, पोलीस अंमलदार विजय कुंभारकर, आकाश फासगे वामन पडळकर, जगदीश खेडकर आदींनी सहभाग घेतला.