विद्यापीठातील या कामासाठी बांधकाम विभागाची परवानगी नसल्याचे समोर आले ...
प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुख्य इमारतीच्या भोवती लोखंडी ग्रील, गेट व दगडी बांधकाम सुरू केले आहे. त्यास महापालिकेच्या बांधकाम विभागाने आक्षेप घेतला आहे. या बांधकामासाठी परवानगी घेतली नसल्याने त्याचा त्वरित खुलासा करावा, परवानगी असल्याशिवाय काम करू नयेत असे आदेश विद्यापीठाला दिले आहेत.पुणे विद्यापीठात मोकळ्या जागांना लोखंडी कुंपण घातल्याचे काम यापूर्वी झाले. आता हेरिटेज दर्जा असलेल्या मुख्य इमारतीच्या परिसरात लोखंडी ग्रील, गेट लावले जात आहेत. यावर काही संघटनांनी आक्षेप घेत काम थांबविण्याची मागणी विद्यापीठाकडे केली होती. विद्यापीठाचा परिसर विद्यार्थ्यांसाठी असताना तो बंदिस्त करून विद्यार्थ्यांवर मर्यादा आणल्या जात असल्याचा आक्षेप संघटनांनी घेतला होता.
महापालिकेच्या वारसा व्यवस्थापन विभागाने गेट, ग्रील, दगडी बांधकामाच्या दुरुस्तीसाठी परवानगी दिली होती. त्यातील अटींमध्ये हेरिटेज मिळकतीच्या परिसरात कोणतेही पाडकाम, दुरुस्ती, बांधकाम करण्यासाठी बांधकाम विभागाची परवानगी घ्यावी; त्याशिवाय काम सुरू करता येणार नाही असे नमूद केले आहे. पण, विद्यापीठातील या कामासाठी बांधकाम विभागाची परवानगी नसल्याचे समोर आले आहे. त्याचा त्वरित खुलासा करावा व पुढील परवानगी मिळेपर्यंत काम करू नयेत, असे आदेश झोन सहाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिले आहेत.
Tags
पुणे