परदेशातून आलेल्या व्यक्तींना क्वारंटाइन होण्यासाठी महापालिका हॉटेलची सोय करणार

 त्याचा खर्च संबंधित व्यक्तीला करावा लागणार ...


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पुणे - परदेशातून आलेल्या व्यक्तींना क्वारंटाइन होण्यासाठी महापालिका हॉटेलची सोय करणार आहे. मात्र, त्याचा खर्च संबंधित व्यक्तीला करावा लागणार आहे. महापालिकेनेही काही कोविड केअर सेंटर्स (सीसीसी) येथेही सोय करण्याची तयारी केली आहे.परदेशांतून आलेल्या नागरिकांना सात दिवस क्वारंटाइन करायचे आहे. त्यांना महापालिकेच्या 'सीसीसी'मध्ये रहायचे नसेल, तर त्यांना हॉटेलमध्ये राहता येणार आहे. त्याची सोय महापालिकेने केली आहे, मात्र याठिकाणी रहायचे असेल तर संबंधित प्रवाशाला स्वत: हा खर्च उचलावा लागणार आहे. करोना काळातही अशीच सोय करण्यात आली होती. त्याच धर्तीवर आताही सोय करण्यात आली आहे. करोनाचे रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर महापालिकेने सर्व 'सीसीसी' बंद केले. परंतु बाणेर आणि नायडू हे सुरू ठेवण्यात आले आहेत. याठिकाणी अद्यापही काही रुग्णांना उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. मात्र याशिवाय येरवडा येथील संत ज्ञानेश्‍वर येथील, हडपसर येथील आणि अन्य काही ठिकाणचे 'सीसीसी' एका दिवसात सुरू करण्याची तयारी महापालिकेची आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 'ओमायक्रॉन'बाधित काही रुग्ण आढळले आहे. याविषयी नागरिकांनी घाबरू नये. आरोग्य विभागाच्या नियमांचे स्वयंस्फूर्तीने पालन करावे. विशेषतः मास्कचा वापर, सोशल डिस्टन्ससह इतर नियम कटाक्षाने पाळावेत. राज्य सरकारच्या आदेश येताच पुढील अंमलबजावणी केली जाईल. शहराच्या सुरक्षिततेसाठी प्रामुख्याने सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. या काळात प्रसारमाध्यमांत येणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्‍वास ठेवावा. कोणीही अफवा पसरवू नयेत; तसेच अनधिकृत माहितीवर विश्‍वास ठेऊ नये.

- डॉ. रवींद्र शिसवे, सहपोलीस आयुक्त, पुणे

Post a Comment

Previous Post Next Post