प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे - जगभरात चिंता निर्माण करणाऱ्या करोनाच्या ओमायक्राॅन विषाणूचा भारतात शिरकाव झाला आहे. तर आज पिंपरीमध्ये सहा तर पुणे शहरात एकाला ओमायक्राॅनचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील एक रूग्ण आळंदीतील असल्याचे वृत्त प्रसारीत झाले होते. मात्र हे वृत्त खोटे असून आळंदीत ओमायक्राॅनचा रुग्ण नसल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे. खेड तालुका, पुणे ग्रामीण या भागात एकही रूग्ण नसल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान आळंदीत ओमायक्राॅनचा रुग्ण सापडल्याचे वृत्त प्रसारीत होताच एकच खळबळ उडाली होती. नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात तब्बल सात रुग्णांमध्ये ओमायक्रॉन विषाणू आढळला आहे. पिंपरीमध्ये सहा तर पुणे शहरात एकाला 'ओमायक्रॉन' विषाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले असून, राज्यात आता बाधित संख्या आठ झाली आहे. 24 नोव्हेंबर 2021 रोजी नायजेरिया देशातील लेगॉस शहरातून आपल्या भावाला भेटण्यासाठी आलेली 44 वर्षीय महिला, तिच्या सोबत आलेल्या दोन मुली आणि पिंपरी चिंचवड शहरात राहणारा तिचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुली असे एकूण 6 जणांच्या प्रयोगशाळा नमुन्यामध्ये ओमायक्रॉन विषाणू सापडल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आज संध्याकाळी दिला आहे.
तसेच पुणे शहरातील 47 वर्षीय पुरुषाला देखील या नवीन व्हेरियंटचा संसर्ग झाल्याचे नॅशनल केमिकल लॅबोरटरीच्या अहवालाने सिध्द झाले आहे. यामुळे महाराष्ट्रातील ओमायक्रॉन विषाणू आढळलेल्या रुग्णांची संख्या आता 8 झाली आहे.
करोना संसर्ग झालेला पहिला रुग्णही राज्यात प्रथम पुण्यातच सापडला होता. आता 'ओमायक्रॉन'ची लागण झालेला पहिला रुग्ण डोंबिवलीत सापडला परंतु पुणे जिल्ह्यात थेट सात जणांना याची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
नायजेरियाची नागरिक असणारी भारतीय वंशाची 44 वर्षांची महिला तिच्या 12 आणि 18 वर्षांच्या दोन मुलींसह आपल्या भावाला भेटण्यासाठी दिनांक 24 नोव्हेंबर 2021 रोजी पिंपरी चिंचवड येथे आली. त्या तिघींना ओमायक्रॉन विषाणूची बाधा असल्याचे आता सिध्द झाले आहे.
या तिघांच्या 13 निकटसहवासितांची तपासणी करण्यात आली असून त्यातील या महिलेचा 45 वर्षाचा भाऊ आणि त्याच्या अनुक्रमे दीड वर्षे आणि 7 वर्षांच्या दोन मुली या कोविड बाधित आल्या होत्या. या तिन्ही निकट सह वासितां मध्ये देखील ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग आढळून आला आहे.
नायजेरियाहून आलेल्या महिलेची आजाराची लक्षणे अत्यंत सौम्य असून इतर 5 जणांना कसलीही लक्षणे नाहीत. या सहा जणांपैकी तिघे हे 18 वर्षाखालील असल्याने त्यांनी कोणतीही लस घेतलेली नाही. उर्वरित तिघांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. दोघांनी कोविशिल्ड तर एकाने कोवॅक्सिन ही लस घेतलेली आहे.
हे सर्व रुग्ण सध्या पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयात भरती असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. पुणे शहरातील ओमायक्रॉन बाधित रुग्ण नेहमीच्या सर्वेक्षणात आढळला असून हा रुग्ण 18 ते 25 नोव्हेंबर 2021 या काळात फिनलंड येथे गेला होता. 29 तारखेला थोडासा ताप आला म्हणून त्याने चाचणी केली असता तो कोविड बाधित आढळला. त्याने कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतले असून सध्या त्यांना कोणतीही लक्षणे नसून प्रकृती स्थिर आहे.