सांगा मोठं कोण…? अमित शहा साहेब, की… छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर.....
रुपाली पाटील ठोंबरे
प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख
पुणे : केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा १९ डिसेंबर रोजी म्हणजे आज पुणे शहरात येत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या स्वागतासाठी पुणे भाजपाने वर्तमानपत्रात एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे.या जाहिरातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोच्या तुलनेत अमित शहा यांचा फोटो मोठा घेण्यात आला आहे. या वर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी भाजपाच्या या जाहिरातीवर टीका केली आहे.
रुपाली ठोंबरे ट्विट करत म्हणाल्या, सांगा मोठं कोण…? अमित शहा साहेब, की… छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर. असा सवाल रुपाली ठोंबरे यांनी भाजपाला केला आहे.
या जाहिरातीमुळे मोठा वाद उद्भवण्याची शक्यता आहे. दरम्यान, बंगळुर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची गुरुवारी विटंबना झाल्याची घटना घडली होती. त्यावरुन राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. यावर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.
केंद्र सरकारच्या निष्काळजीपणामुळेच बंगळुरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाली, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालून तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावे, अशी मागणी केली आहे.