तुळशी बागेत व्यापारी संघटनांकडून खासगी बाउन्सर तैनात



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

जिलानी ( मुन्ना) शेख :

 पुणे- तुळशी बागेतील गर्दी नियंत्रित करण्यासोबतच भुरट्या चोरांना अटकाव करण्यासाठी परिसरातील व्यापारी संघटनांकडून या भागात खासगी बाउन्सर तैनात करण्यात आले आहेत.या बाउन्सरमुळे महापालिकेस मदतच होणार असली तरी या बाउन्सरकडून नागरिकांना कोणताही त्रास झाल्यास त्यांच्यावर महापालिकाच गुन्हे दाखल करेल, अशी माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.

महापालिकेच्या गुरुवारी झालेल्या मुख्यसभेत तुळशीबागेत नेमण्यात आलेल्या बाउन्सरबाबत माजी सभागृह नेते सुभाष जगताप यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यानंतर, जगताप यांनी या प्रकरणी माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल, असे सांगण्यात आले होते. याबाबत बोलताना जगताप म्हणाले की, तुळशीबाग परिसरात मोठ्या प्रमाणात चोऱ्यांच्या घटना वाढलेल्या आहेत. तसेच अनेक नागरिक या भागात दुचाकी घेऊन जात आहेत. त्यामुळे वर्दळीस अडथळे होत आहेत. त्यामुळे या भागातील व्यापाऱ्यांनीच पुढाकार घेऊन हे बाउन्सर नेमले आहेत.

मात्र, त्यांच्याकडून मास्क वापरला जात नसल्याचे फोटो समोर आले आहेत. त्यामुळे, त्याबाबत संबधितांना सूचना देण्यात आल्या आहे. या बाउन्सरमुळे महापालिकेस फायदाच होणार असली तरी, या बाउन्सरमुळे कोणत्याही नागरिकास त्रास झाल्यास अथवा महिलांकडून तक्रार आल्यास संबधितांवर पालिका गुन्हे दाखल करेल, असा इशारा जगताप यांनी दिला आहे. पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे स्थिर पथकही काही दिवस या ठिकाणी ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post