प्रेस मीडिया वृत्तसेवा : अन्वरअली शेख :
पुणे : पुण्यात सध्या महापालिका निवडणुकीचे वार वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुन्हा एकदा पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पक्ष संघटनेवर बळ देताना दिसत आहेत. या दौऱ्यात राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांसोबत वैयक्तिक पातळीवर संवाद साधून त्यांची मतं जाणून घेत आहेत. तसंच येणाऱ्या निवडणुकीबाबत रणनिती ठरवली जाणार असल्याचं मनसे नेत्यांकडून सांगितलं जात आहे. अशावेळी राज ठाकरे यांनी आज दुपारी एका कार्यकर्त्याच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतला.
राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. या दरम्यान राज ठाकरे यांनी पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभाग अध्यक्ष संतोष चव्हाण यांच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतला. कमरेवर झालेल्या शस्त्रक्रीयेमुळे राज ठाकरे यांना पदाधिकाऱ्यांसोबत पंगतीत न बसता खुर्चीवर बसून जेवण करावं लागलं. यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते अनिल शिदोरे, बाबू वागसकर, सरचिटणीस किशोर शिंदे, मनसे राज्य सचिव सचिन मोरे, उपाध्यक्ष बाळा शेडगे, नगरसेवक वसंत मोरे, श्रीनिवास घाटगे हे देखील उपस्थित होते.
पुण्यात पदाधिकाऱ्यांसोबत बैठका आणि चर्चा
दरम्यान, बुधवारी नियोजित बैठका झाल्यानंतर राज ठाकरे यांचा आज 9 ते 11 वाजता कसबा मतदारसंघ, 12 ते 2 पर्वती मतदारसंघ, दुपारी 4 ते 5:30 वाजता कॅन्टोन्मेंट मतदार संघ आणि संध्याकाळी 6 ते 7:30 वाजता वडगावशेरी मतदार संघाची बैठक, असा कार्यक्रम आहे. शुक्रवारी 17 डिसेंबरला आजी माजी नगरसेवक यांची बैठक होणार आहे, अशी माहिती यावेळी मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली.