सर्वांचे मामा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा सन्मान.

 अशा चतुरस्र अभिनेत्याला पीआयएफएफचा मानाचा 'विशेष पुरस्कार' मिळणे तमाम मराठी जनांसाठी अभिमानास्पद आहे.


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अन्वरअली शेख :

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (पीआयएफएफ) संचालक आणि प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी यंदाच्या 'पीआयएफएफ विशेष पुरस्कारा'ची घोषणा करताच प्रत्येक मराठी मन रोमांचित झाले.भारतीय चित्रपट क्षेत्रातील मोलाच्या योगदानाबद्दल हा पुरस्कार ज्यांना दिला जाणार आहे, ते ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ हे प्रत्येक मराठी माणसाला नेहमी आपल्या घरातील व्यक्‍तीच वाटत आले आहेत.

कितीही विशेषणे दिली तरी अपुरीच पडतील, हे ठाऊक असलेला मराठी चित्रपटरसिक अशोक सराफ यांना 'मामा' या दोन अक्षरांत बांधतो आणि सराफ यांना मिळालेल्या अलोट प्रेमाचे प्रतिबिंब याच संबोधनात सर्वाधिक स्पष्ट दिसते. जगातील 57 देशांमधील 127 पेक्षा अधिक उत्तमोत्तम चित्रपटांच्या महोत्सवात मामांना हा सन्मान मिळणे हा दुग्धशर्करा योग प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत आत्यंतिक आदराने घेतले जाणारे नाव म्हणजे अशोक सराफ. त्याचे कारण केवळ त्यांची अफाट लोकप्रियता एवढेच नसून, त्यांचा चतुरस्र अभिनय आणि प्रत्येक भूमिका अविस्मरणीय करण्याची त्यांची ताकद हे खरे कारण आहे. मराठी रसिकांनी मामांवर उदंड प्रेम केले ते या मुळेच! भूमिका कोणतीही असली तरी त्यात काहीतरी नवीन प्रयोग करायचा आणि ती भूमिका लोकांच्या कायम स्मरणात राहील अशीच करायची, ही मामांची खासियत.

4 जून 1947 रोजी मुंबईत जन्मलेल्या सराफ यांचे मूळ गाव बेळगाव; परंतु वडिलांचा व्यवसाय मुंबईत. त्यामुळे मुंबईतच शिक्षण घेतले. अभिनयाची आवड आधीपासूनच त्यांना होती; परंतु कोणत्याही मराठी माणसाप्रमाणेच शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी नोकरी करावी, असे त्यांच्या वडिलांनाही वाटत होते. वडिलांचा शब्द मानून त्यांनी बॅंकेत नोकरी पत्करली; परंतु नोकरी करत-करत संधी मिळेल तेव्हा ते नाटकात भाग घेतच राहिले.

मामांना कोणत्याही भूमिकेचे वावडे नाही. त्यांनी विनोदी भूमिका सगळ्यात जास्त केल्या, हे खरे; परंतु जेव्हा गंभीर भूमिका केली तेव्हा प्रेक्षक अंतर्मुख झाले; हळहळले. त्यांनी खलनायकसुद्धा त्याच ताकदीने रंगवला. विनोदी अभिनेता ही त्यांची खरी ओळख आहे आणि मराठी चित्रपटसृष्टीला तेच त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. कारण चित्रपटांमध्ये आलेला तोचतोपणा आणि त्यामुळे आलेली मरगळ अशोक सराफ यांच्या विनोदाने झटकली गेली.

अवकळा आलेल्या मराठी चित्रपटसृष्टीला पुन्हा वैभवाचे दिवस दाखविणाऱ्यांमध्ये मामांचे योगदान महत्त्वाचे आहे. विशेषतः 1980 च्या दशकात अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याखेरीज मराठी चित्रपट असूच शकत नाही, अशी धारणा तयार झाली होती. यशाचे हुकमी एक्‍के असेच हे दोन विनोदवीर!

'दोन्ही घरचा पाहुणा'मधून मामांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले असले तरी 'पांडू हवालदार' हा त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा चित्रपट ठरला. दादा कोंडके यांच्यासारखा लोकप्रिय विनोदवीर जोडीला असताना प्रेक्षकांच्या लक्षात राहील अशी भूमिका करणे हे मोठे आव्हान होते आणि मामांनी ते समर्थपणे पेलले. तेव्हापासून मामांची कारकीर्द उत्तरोत्तर बहरतच गेली. आज ते 75 वर्षांचे आहेत, हे सांगावे लागते.

सदाबहार व्यक्‍तिमत्त्व म्हणूनच ते सर्वांना परिचित आहेत. उलट वाढत्या वयाबरोबर त्यांचा अभिनय अधिक परिपक्‍व आणि अधिक हवाहवासा बनला. दरम्यान, सुरुवातीच्या काळात जेव्हा नाटकाचे प्रयोग वाढत चालले, तेव्हा बॅंकेत दांड्या पडू लागल्या आणि सुमारे दहा वर्षांच्या नोकरीनंतर मामांनी बॅंकेला रामराम ठोकला. पांडू हवालदारमधील मामांची भूमिका पाहून त्यांना चित्रपटांच्या ऑफर्स वाढत गेल्या. मध्यंतरी विनोदी चित्रपटाचा एक हुकमी फॉर्म्युला तयार झाला होता. रसायन बऱ्यापैकी सारखेच असायचे, पण मामांनी प्रत्येक भूमिका वेगळी करून चित्रपटात रंग भरले.

'कॅरिकेचर' म्हणजे अर्कचित्र प्रेक्षकांसमोर उभे करणे या बाबतीत मामांचा हात धरणारा दुसरा अभिनेता आजमितीस तरी दिसत नाही. अर्कचित्रासाठी निरीक्षणशक्‍ती जबरदस्त असावी लागते. लकबींना गडद स्वरूप देऊन अशी पात्रे उभी करावी लागतात. प्रचंड एकाग्रतेने काम करावे लागते. एकदा पकडलेली लकब संपूर्ण चित्रीकरणादरम्यान कायम ठेवावी लागते. ही गोष्ट सोपी नाही.

'धूमधडाका'मधील नवकोटनारायण यदुनाथ जवळकर किंवा 'गुपचूप गुपचूप'मधील गोव्यातला प्रोफेसर धोंड ही काही ठळक उदाहरणे आहेत. निरीक्षणशक्‍ती आणि एकाग्रतेबरोबरच विनोदासाठी आवश्‍यक असणारे 'टायमिंग' आणि 'प्लेसिंग' या दोन्ही गोष्टी मामांकडे भरभरून आहेत. नवोदित अभिनेत्यांनी टायमिंग सेन्सचा अभ्यास करताना नेहमीच अशोकमामांना आदर्श मानले आहे. टायमिंग चुकले की विनोदाचा फज्जा उडतो आणि म्हणूनच ती तारेवरची कसरत असते.

'अशी ही बनवाबनवी'मधील धनंजय माने असो वा 'माझा पती करोडपती'मधला लुकतुके असो, या भूमिका अस्सल मराठी चित्रपटरसिकांच्या विस्मृतीत जाणेच शक्‍य नाही. सचिन पिळगावकर, अशोक सराफ, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे ही नावे चित्रपटाशी जोडलेली असणे म्हणजे हमखास 'हाउसफुल्ल'ची गॅरंटीच! मराठी चित्रपटसृष्टीला पडत्या काळात ज्यांनी खऱ्या अर्थाने सावरले आणि मराठी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची पावले पुन्हा चित्रपटगृहाकडे वळवली, अशी ही चार नावे होतं.

अशोकमामा हे मराठी चित्रपटातील सुपरस्टार आहेतच; परंतु हिंदी चित्रपटांतसुद्धा त्यांनी अनेक अविस्मरणीय भूमिका केल्या. अर्थात, मराठीत कितीही लोकप्रिय असला तरी त्याला हिंदी चित्रपटात फार महत्त्वाची भूमिका दिली जात नाही, ही सल मराठी माणसाला मामांच्या बाबतीत अधिक टोचते. कुछ तुम कहो कुछ हम कहें, बेटी नं. वन, कोयला, गुप्त, ऐसी भी क्‍या जल्दी है, जोरू का गुलाम, करण अर्जुन, येस बॉस अशा अनेक हिंदी चित्रपटांत मामांनी यादगार भूमिका केल्या.

अलीकडेच अजय देवगणच्या 'सिंघम'मधील त्यांनी रंगवलेला हेडकॉन्स्टेबल कोण विसरू शकेल? छोट्या पडद्यावरसुद्धा मामांनी तेवढ्याच ताकदीने धडक दिली. 'हम पॉंच' ही मालिका आज अनेक वर्षांनंतरही सर्वांच्या स्मरणात आहे. पाच मुलींच्या पित्याची भूमिका त्यांनी रंगविली होती. पाचही मुलींची स्वतंत्र तऱ्हा या मालिकेत दाखविली होती आणि त्यामुळे प्रत्येक वेळी अडचणीत येणारा, हताश होणारा पिता मामांनी त्यांच्या खास विनोदी शैलीत रंगवला होता.

मराठी नाटकांमधील मामांचे योगदान कधीच विसरता येत नाही. 'हमीदाबाईची कोठी' नाटक ज्यांनी पाहिले, त्यांनी अशोक सराफ यांच्या अभिनयाचा आवाका केवढा प्रचंड आहे, याचा अनुभव घेतला. डार्लिंग डार्लिंग, सारखं छातीत दुखतंय अशी अनेक नाटके अशोक मामांनी केली. अगदी अलीकडचे त्यांचे 'मनोमीलन' नाटक रसिकांच्या चांगलेच स्मरणात आहे. अशा चतुरस्र अभिनेत्याला पीआयएफएफचा मानाचा 'विशेष पुरस्कार' मिळणे तमाम मराठी जनांसाठी अभिमानास्पद आहे.

Post a Comment

Previous Post Next Post