म्हाडाच्या विविध पदांसाठी रविवारी घेण्यात येणारी परीक्षाच रद्द करण्यात आली.
प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख
राज्यातील आरोग्य विभाग भरतीची प्रश्नपत्रिका फुटीनंतर आता पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने म्हाडा परीक्षेचा पेपर फोडणाऱ्याचा पर्दाफाश केला आहे.याप्रकरणी संबंधित परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या संचालकांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे म्हाडाच्या विविध पदांसाठी रविवारी घेण्यात येणारी परीक्षाच रद्द करण्यात आली. परीक्षेच्या नियोजनाची जबाबदारी असलेल्या पुण्यातील जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचे संचालक डॉ. प्रीतीश देशमुख यानेच पेपर फोडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रीतीश देशमुख (रा. खराळकाडी, पिंपरी), अंकुश रामभाऊ हरकळ (रा. किनगाकराजा, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा), संतोष लक्ष्मण हरकळ (रा. मिलेनियम पार्क, संभाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या तीन साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणी म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने पाटील यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
संभाजीनगरमधील टार्गेट करिअर पॉइंट या संस्थेचा संचालक अजय चव्हाण आणि सक्षम अकॅडमीचा संचालक कृष्णा जाधक यांनी पेपरफोडीचा डाव रचल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याद्वारे पुण्यातील संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांनी म्हाडाची प्रश्नपत्रिका फोडून विद्यार्थ्यांना देण्याची तयारी सुरू केली होती.
पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा अजय चव्हाण, कृष्णा जाधव, अंकित चनखोरे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे म्हाडा परीक्षेतील तीन उमेदवाची प्रवेशपत्रे, शैक्षणिक प्रमाणपत्रे, कोरे धनादेश, आरोग्य विभागाच्या परीक्षेतील 35 उमेदवारांच्या नावांची यादी सापडली. त्यानंतर पुणे सायबर विभागाच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली एसीपी विजयकुमार पळसुले, पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, पोलीस निरीक्षक मीनल पाटील, पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, पोलीस उपनिरीक्षक अनिल डफळ यांनी पुण्यात तातडीने तपास केला. पथकाने माहिती काढून मोटारीतून जाणाऱया तिघांना ताब्यात घेतले. झडती घेतली असता त्यांच्याकडे म्हाडा परीक्षेचा पेपर मिळून आला.
पेपर कधी मिळणार … विद्यार्थ्यांनी केला संपर्क
सायबर पोलिसांनी ताब्यात घेतलेले आरोपी संतोष व अंकुश यांच्याकडे मोबाईल सापडले होते. त्यांच्या मोबाईलमध्ये म्हाडा लेखी परीक्षेसंदर्भात संशयास्पद चॅट आणि संभाषण झाल्याचे आढळून आले आहे. दोघांना अटक केल्यानंतर काही वुद्यार्थ्यांनी त्यांच्या फोनकर संपर्क करून प्रश्नपत्रिका कोठे व कधी मिळणार, याची चौकशी केल्याचे पोलिसांनी सांगितले.
विश्रांतवाडीतून तिघांना अटक
सायबर पोलिसांनी संशयित संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांच्या हालचालीवरून त्यांना ट्रेस केले. त्यानुसार ठाण्यातून लोणावळ्यापर्यंत पोहोचलेल्या पथकाने पुण्याकडे आरोपींच्या दिशेने मोर्चा वळविला. त्यांच्या गाडीतून प्रवास करणाऱया जी. ए. सॉफ्टवेअरचा संचालक डॉ. प्रितिश देशमुख यालाही अटक करण्यात आली. त्यांच्या लॅपटॉपमध्ये लेखी परीक्षेचा पेपर आणि एका लिफाफ्यामधील पेन ड्रॉईक्हमध्ये म्हाडाच्या लेखी परीक्षेचे पेपरसेट सापडले.
आरोग्य विभाग भरती पेपरफुटीचा तपास सुरू असतानाच म्हाडा परीक्षेचाही पेपर फुटणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सायबर पोलिसांच्या तीन पथकांनी दिवसरात्र मेहनतीने तपास केला. त्यानंतर अधिकाऱयांसह कर्मचाऱयांनी रात्र जागून काढत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
अमिताभ गुप्ता , पोलीस आयुक्त, पुणे