आता पर्यंत सुपे यांच्याकडून 2 कोटी 57 लाख रुपये हस्तगत करण्यात आले
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
अनवरअली शेख :
पुणे : टीईटी परीक्षा पेपरफुटीत अटक करण्यात आलेल्या परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्या कडील घबाड संपता संपत नाही. याचं कारण आज तुकाराम सुपेंकडे 10 लाखांची रोकड मिळाली आहे.सुपेंनी ही रोकड जवळच्या व्यक्तीकडे ठेवायला दिली होती. तीच रोकड त्या व्यक्तिनं आज पोलिसांच्या स्वाधीन केली. आता पर्यंत सुपे यांच्याकडून 2 कोटी 57 लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहे, अशी माहिती सायबर पोलीस स्टेशनच्या डीसीपी भाग्यश्री नवटके यांनी दिली आहे.
TET परीक्षा पेपरफुटी प्रकरणात तुकाराम सुपेंच्या घरावर दुसऱ्यांदा धाड टाकली त्यात पोलिसांनी जवळपास दोन कोटींचं घबाड जप्त केलंय. सुपेंच्या घरातून 1 कोटी 58 लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने हस्तगत केल्याची माहिती मिळाली. पहिल्या धाडीत पोलिसांनी 90 लाखांचं घबाड हस्तगत केलं होतं. पण पुन्हा पोलिसांचा छापा पडण्याच्या भीतीनं सुपेंच्या पत्नी आणि मेहुण्यानं रक्कम आणि दागिने दुसरीकडे लपवले. पण पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर रोख रकमेसह ऐवज पोलिसांच्या हाती लागले.आणि आत्ता एका व्यक्तीने दहा लाख रुपये आणून दिल्याने एकूण 2 कोटी 57 लाख रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहे. दरम्यान जी ए टेक्नॉलॉजीज कंपनीला टी ई टी परिक्षेचे कंत्राट मिळवून देण्यासाठी लायझनींग करणाऱ्या सौरभ त्रिपाठी ला पुणे पोलिसांनी लखनऊमधुन अटक केली आहे.
म्हाडा पेपर फुटी प्रकरणी सुरू असलेल्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत असून इतर परीक्षां मधील घोटाळे बाहेर येत आहेत. शिक्षक पात्रता परीक्षेतही पैसे घेऊन अनेकांना उत्तीर्ण करण्यात आल्याचे समोर आले आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले होते की, दोन पेपर फुटीचे प्रकरणाचा तपास सुरू होता. म्हाडा पेपर फुटीचा तपास सुरू असताना टीईटीमध्ये गोंधळ असल्याचे दिसून आले. या प्रकरणी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली. या मध्ये सुपे आणि सावरीकरचा समावेश आहे.