लवकरच रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या नवजात बालकांना आधार कार्ड उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू.



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

अनवरअली शेख :

पुणे : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) लवकरच रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या नवजात बालकांना आधार कार्ड उपलब्ध करून देण्याची तयारी करत आहे. UIDAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ गर्ग यांनी म्हटले आहे की, प्राधिकरण नवजात बालकांना आधार क्रमांक देण्यासाठी जन्म निबंधकांशी करार करण्याचा प्रयत्न करत आहे.एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, गर्ग यांनी सांगितले की, देशातील ९९.७ टक्के प्रौढ लोकांची आधारसाठी नोंदणी झाली आहे.131 कोटी लोकांची नोंदणी केली आहे आणि आता आम्ही नवजात बालकांना आधारशी जोडण्याचा प्रयत्न करत आहोत. देशात दरवर्षी दोन ते अडीच कोटी मुले जन्माला येतात.

गर्ग म्हणाले की, नवजात बालकांना जन्माच्या वेळी त्यांचे छायाचित्र काढून आधारकार्ड देण्यात येणार आहे. आम्ही पाच वर्षांखालील मुलांचा बायोमेट्रिक डेटा घेत नाही. परंतु त्यांचे आधार त्यांच्या आई किंवा वडिलांच्या आधाराशी लिंक केले जाईल. योग्य वय झाल्यावर त्यांचा बायोमेट्रिक डेटा घेतला जाईल.

UIDAI CEO पुढे म्हणाले की, आम्ही देशातील संपूर्ण लोकसंख्येला आधार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. गेल्या वर्षी आम्ही दुर्गम भागात १० हजारांहून अधिक शिबिरे उभारली होती. यादरम्यान अनेक लोकांकडे आधार नसल्याचं आढळून आलं असून ३० लाख लोकांची नोंदणी झाली आहे.

सौरभ गर्ग पुढे म्हणाले की, आम्ही पहिले आधार 2010 मध्ये जारी केले होते. त्यानंतर अधिकाधिक लोकांची नोंदणी करण्याचा आमचा उद्देश होता आणि आता आमचे लक्ष आधार अपडेटवर आहे. आत्तापर्यंत सुमारे 10 कोटी लोक दरवर्षी त्यांचे नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर त्यांच्या आधारमध्ये अपडेट करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post