पुण्यातील दुहेरी उड्डाणपुलाचे काम 80 टक्के पूर्ण

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विशेष प्रयत्नातून या पुलाची उभारणी होत आहे


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

जीलाणी (मुन्ना ) शेख :

 पुणे- सदैव वर्दळीचा असणाऱ्या कर्वे रस्ता-नळस्टॉप चौक येथील दुहेरी उड्डाणपुलाचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विशेष प्रयत्नातून या पुलाची उभारणी होत आहे.पुलामुळे नळस्टॉप येथील वाहतुकीची कोंडी फुटणार आहे. हा उड्डाणपूल लवकरच नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात वाहतुकीसाठी सुरू होणार आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह स्थानिक नगरसेवकांनी नुकतीच या पुलाच्या कामाची पाहणी केली. महामेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. ब्रीजेश दीक्षित, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, स्थानिक नगरसेवक दीपक पोटे, जयंत भावे, माधुरी सहस्रबुद्धे, मंजुश्री खर्डेकर यांच्यासह महापालिका आणि मेट्रो अधिकारी उपस्थित होते. नळस्टॉप चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासह मेट्रो मार्गाचे कामही होण्याच्या अनुषंगाने या पुलासाठी तत्कालिन स्थायी समिती अध्यक्ष आणि विद्यमान महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुढाकार घेत नागपूर मेट्रोच्या धर्तीवर हा पूल प्रस्तावित केला होता.

सुमारे 540 मीटर लांब असलेला हा पूल कर्वे रस्त्याच्या दोन्ही बाजूनां थेट एसएनडीटी महाविद्यालयापासून ते स्वातंत्र्य चौकापर्यंत आहे. त्यामुळे कोथरूडकडे जाणाऱ्या वाहनांना आता नळस्टॉप चौकात न थांबता पुढे जाता येईल. पुलासाठी आतापर्यंत पालिकेने सुमारे 40 कोटींचा निधी दिला असून करोना काळात पुलाचे काम रखडल्याने महामेट्रोने अतिरिक्त निधीची मागणी केली होती.

Post a Comment

Previous Post Next Post