कृष्ण प्रकाश यांनी तेथे पडलेले झाड फेकले त्या मुळे आरोपी खाली पडून पोलिसांच्या तावडीत सापडले..
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
अनवरअली शेख :
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आक्रमक कारवाई करत गुन्हेगारांना जरब बसविण्याचा इरादा पक्का केला. या मोहिमेचे नेतृत्व खुद्द पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केली.रविवारी (ता.२६) मध्यरात्री चाकण (ता.खेड, जि .पुणे) येथे पिंपरी-चिंचवड पोलिस आणि तीन गुंडात चकमक उडाली. दोन्ही बाजूंकडून दोन-दोन गोळ्या झाडण्यात आल्या. मात्र, त्यातील एकही गोळी कोणाला लागली नाही.
पोलिस पथकावर गोळीबार करून पळणाऱ्या आरोपींवर कृष्ण प्रकाश यांनी प्रसंगावधान राखत तेथे पडलेले झाड फेकले. त्यामुळे आरोपी खाली पडून पोलिसांच्या तावडीत सापडले. यावेळी सशस्त्र गुंडांशी झटापट करून त्यांना आयुक्तांनी निशस्त्र केले. या झोंबाझोंबीत त्यांना किरकोळ खरचटले,असे त्यांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले. यावेळी स्वत: वा इतर कोणी पोलिस गुंडांच्या गोळीबारात जखमी झालेलो नाही, असे ते म्हणाले.
थेट पोलिस आयुक्तांनी चकमकीचे नेतृत्व करीत त्यात भाग घेतल्याची ही पहिलीच घटना आहे. मुंबईत उपायुक्त पदावर असताना आयपीएस अशोक कामठे यांनी अशा चकमकीत स्वत गुंडाला यमसदनी धाडले होते. नंतर मुंबईवरील पाक अतिरेक्यांच्या गोळीबारात त्यावेळी अतिरिक्त पोलिस आयुक्त असलेले कामठे हुतात्मा झाले होते. त्यांच्यासारख्या उच्च पदावरील काही अपवादात्मक अधिकारीच अशा मोहिमांत सहभागी झालेले आहेत.
सहसा सहाय्यक आयुक्त (एसीपी) व निरीक्षक (पीआय) दर्जापर्यंतचे धाडसी,अनुभवी, नेमबाजीत निष्णात गुन्हे शाखेचे (क्राईम ब्रॅंच)अधिकारीच अशा चकमकीत भाग घेतात. परंतु, शहरातील वाढती गुन्हेगारी व त्यातही गेल्या काही दिवसांत तीन खून झाल्याने स्वतछ फिल्डवर उतरत आपल्या पोलिस दलाचे मनोधैर्य उंचावण्याचा प्रयत्न पोलिस आयुक्त केपी म्हणजे कृष्णप्रकाश यांनी केल्याची चर्चा आहे.
पोलिस उपायुक्त मंचक इप्पर आणि आनंद भोईटे यांनी पत्रकार परिषेदत या चकमकीविषयी माहिती दिली. या महिन्यात १८ तारखेला दत्तजयंतीला पिंपरी-चिंचवडमध्ये पिंपळे गुरव येथे अत्यंत वर्दळीच्या अशा काटेपुरम चौकात योगेश जगताप या सराईत गुंडाचा प्रतिस्पर्धी टोळीतील दोघांनी गोळ्या झाडून भरदिवसा खून केला होता. स्थानिक वर्चस्वातून गणेश हनुमंत मोटे (वय २३,रा.सांगवी मूळचा सोलापूर) आणि अश्विन आनंदराव चव्हाण (वय २१, रा. नवी सांगवी, मूळचा सोलापूर) यांनी हा गोळीबार केला होता. त्यानंतर ते पळून गेले होते. या खूनाच्या गुन्ह्यात त्यांच्या अक्षय केंगले आणि गणेश ढमाले (दोघेही रा. सांगवी) या त्यांच्या दोन साथीदारांना दोन दिवसांनंतर पकडण्यात आले होते.
पोलिस आयुक्तांनी फेकून मारलेले हेच ते झाड
फरार झालेले गणेश आणि अश्विन हे दोघे हल्लेखोर आणि त्यांचा साथीदार महेश तुकाराम माने (वय २३, रा.सांगवी,मूळचा उस्मानाबाद) हे खेड तालुक्यातील कोये गावात असल्याचे त्यांच्या मोबाईल लोकेशनवरून पोलिसांना समजले. लगेच चार टीम तयार करून स्वत: कृष्णप्रकाश या आरोपींना पकडण्यासाठी रवाना झाले. रात्री सव्वाअकराच्या सुमारास हे त्रिकूट लपलेल्या घराला पोलिसांनी वेढा घातला. हे समजताच दोघांनीही पोलिसांवर एकेक राऊंड फायर करून जवळच्या डोंगराच्या दिशेने पळ काढला. त्याला उत्तर म्हणून सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोणपे, सहाय्यक निरीक्षक सतीश कांबळे यांनी एकेक गोळी झाडली. (एपीआय) त्यावेळी पळणाऱ्या या गुंडाच्या दिशेने आयुक्तांनी तेथे पडलेले एक झाड फेकून मारले. त्यामुळे ते खाली पडले. हे पाहून इतर पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.त्यांच्याकडून दोन पिस्तूले जप्त करण्यात आली आहेत.
याच पिस्तूलातून त्यांनी जगतापचा खून केल्याचा संशय आहे. या त्रिकूटाविरुद्ध चाकण पोलिस ठाण्यात पोलिस आय़ुक्तांसह इतर पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गोळीबार करून त्यांच्या खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सांगवीच्या खूनाच्या कटातील गुन्ह्यात मोटेच्या आणखी सहा साथीदारांना अटक होणे बाकी आहे.