हिंजवडी-चाकण मेट्रो मार्गिके सविस्तर प्रकल्प अहवाल तयार

 प्रकल्प अहवाल महामेट्रो मार्फत पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे मंजुरीसाठी पाठविला...

प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

अनवरअली शेख :

पिंपरी - हिंजवडी-चाकण मेट्रो मार्गिके मधील नाशिक फाटा ते चाकण (मोशी मार्गे) या मेट्रो मार्गिकेसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल मे.राईट्‌स या केंद्र शासनाच्या संस्थेकडून तयार केला आहे.हा प्रकल्प अहवाल महामेट्रो मार्फत पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे मंजुरीसाठी पाठविला आहे, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात सादर प्रश्‍नाच्या लेखी उत्तरात दिली आहे.

आमदार लक्ष्मण जगताप यांनी याबाबत राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित केला होता. त्या प्रश्‍नाच्या उत्तरात शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. हिंजवडी येथे विविध कंपन्यांचे लाखो कर्मचारी ये-जा करीत असतात. शिवाजी चौक येथे त्यामुळे वाहतूक कोंडी होत असते.
चाकण औद्योगिक पट्ट्यात वाहन उत्पादन कंपन्या व कारखाने आहेत. चाकण येथील कामगार व नागरिक यांची त्यामुळे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. हिंजवडी आणि चाकण येथे त्यामुळे दररोज सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडी होते.

हिंजवडी आय.टी. पार्कमध्ये ये-जा करणारे वाहनचालक यांना तूर्तास एकच रस्ता उपलब्ध आहे. पर्यायाने, त्या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण वाढून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. संबंधित वाहतूक कोंडी दूर होण्यासाठी पीएमआरडीएकडून पुणे-हिंजवडी ते चाकण मेट्रो कॉरिडॉर सुरू करण्याबाबत विविध कंपन्या, नागरिक, कामगार संघटना आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी शासनाकडे मागणी केलेली आहे.

हिंजवडी-शिवाजीनगर कॉरिडॉरप्रमाणे हिंजवडी-चाकण मेट्रो कॉरिडॉरचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करून संबंधित प्रस्ताव शासन मान्यतेसाठी पाठविण्याबाबत काय कार्यवाही केली आहे, असा प्रश्‍न आमदार जगताप यांनी अधिवेशनात उपस्थित केला होता.

त्यांना दिलेल्या लेखी उत्तरात शिंदे यांनी म्हटले आहे की, पीएमआरडीएच्या सर्वंकष आराखड्यामध्ये विविध कॉरीडॉरवर मेट्रो प्रणाली राबविण्याबाबत शिफारस केली आहे. हिंजवडी ते चाकण अशा एकूण 30.08 कि.मी. अंतरात हा मेट्रो मार्ग विकसित करण्याचे नियोजन आहे. पीएमआरडीएकडून हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे.

या मेट्रो मार्गात हिंजवडी-चाकण या प्रस्तावित मेट्रो मार्गिकेमधील हिंजवडी ते वाकड (भुजबळ) चौक या लांबीपर्यंतच्या मेट्रो मार्गाचा समावेश आहे. तसेच, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सुचनेनुसार महामेट्रोमार्फत हिंजवडी ते चाकण मेट्रो मार्गातील नाशिक फाटा ते चाकण (मोशी मार्गे) या मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्र शासनाच्या मे. राईट्‌स या संस्थेकडून तयार करून घेतला आहे. हा प्रकल्प अहवाल महामेट्रोकडून महापालिकेच्या मंजुरीसाठी पाठविला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post