पिंपरी-चिंचवड शहराला २०२२ मध्ये देशातील पहिल्या क्रमांकाचे शहर बनविण्यासाठी मनपा प्रयत्नशील.... महापौर उषा उर्फ माई ढोरे

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला २०२२ मध्ये देशातील पहिल्या क्रमांकाचे शहर बनविण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने स्वच्छागृह अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२२ आणि स्वच्छता विषयक जनजागृती बाबत सोसायटी आणि शैक्षणिक या दोन टप्यातील कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन करताना महापौर माई ढोरे बोलत होत्या. या कार्यशाळेस आयुक्त राजेश पाटील, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके,शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. के.अनिल राॅय,उप आयुक्त संदीप खोत,सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे,आरोग्य अधिकारी गणेश देशपांडे, प्रभागांचे सहाय्यक आरोग्याधिकारी तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, शहरातील काही मोठ्या झिरो वेस्ट संकल्पना राबविणा-या सोसायटीमधील पदाधिकारी, प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, विविध शैक्षणिक संस्थांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक उपस्थित होते.

आयुक्त राजेश पाटील यांनी सर्वांना उद्देशून केलेल्या प्रास्ताविक भाषणात वसुंधरेचे जतन करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे, पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्यामुळे आपण सर्वजण धोक्याच्या पातळीकडे जात आहोत,यासाठी कच-याचे वर्गीकरण महत्वाचे आहे असे सांगितले. शहरातील नागरिकांनी स्वच्छतेबाबत प्रयत्न करावेत. त्याचप्रमाणे उपस्थित मुख्याध्यापकांनी, शिक्षकांनी देखील आपल्या विद्यार्थ्यांना ओला-सुका कचरा वर्गीकरण याचे महत्व पटवून द्यावे आणि त्याबाबत आग्रह धरून ही योजना प्रत्येक घराघरात कशी पोहोचविता येईल याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके यांनी शहराला पुढील काळात प्रथम क्रमांक मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही सतत प्रयत्नशील असून नागरिकांचा देखील याबाबत सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी या कार्यशाळेचे संगणकीय सादरीकरण केले. सादरीकरण करत असताना त्यांनी शासनाचे कचरा वर्गीकरणाचे नियम, शासनाच्या विविध आदेशांची आणि नियमांचे उल्लंघन केले तर प्रस्तावित दंडात्मक कारवाई बाबत विस्तृत माहिती दिली.

 यावेळी झिरो वेस्ट संकल्पना राबविणा-या गणेश बोरा,स्वाती कोरडे, मेधा खांडेकर, मनोज सिनकर आणि सुनिता शिंदे यांचा महापौर माई ढोरे यांच्या हस्ते वृक्षरोप देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यशाळेचे प्रास्ताविक आयुक्त राजेश पाटील यांनी, सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी तर आभार अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post