दफनभूमीच्या मागणीसाठी मुस्लिम बांधव सरसावले ; परिसरातील सर्व मस्जिद प्रमुखांची बैठक .
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
थेरगाव : दफनभूमीच्या प्रश्नवर थेरगाव येथील मक्का मस्जिद मध्ये थेरगाव ,काळेवाडी ,वाकड परिसरातील सर्व मस्जिद मधील प्रमुखांची बैठक अयोजित करण्यात आली होती. मागील २५ वर्षांपासून परिसरातील नागरिक दफनभूमीची मागणी करीत आहेत. अनेक सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेशी दफनभूमी साठी जागा उपलब्ध करून देणेबाबत वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे परिसरात मुस्लिम कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची मयत झाल्यास त्याला जागा उपलब्ध नाही , चिंचवड च्या दफनभूमीमध्ये खोदकाम करताना सांगाडे आढळून येतात. त्यामुळे प्रेतांची विटंबना व अवहेलना होत आहे.
या बैठकीमध्ये दफनभूमी प्रश्नी शासनाविरोधात लढा देण्यासाठी पुढील रणनीती ठरविण्यात आली. परिसरातील प्रत्येक कुटुंबापर्यंत जाऊन याबाबत जनजागृती करणायचा निर्णय घेण्यात आला व पुढील काही दिवसांमध्ये कब्रस्तान संघर्ष समिती च्या कार्यकारिणीची निवड करून पुढील कामकाज सुरु करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी माहिती देताना कब्रस्तान संघर्ष समिती तर्फे बोलताना सिद्दीकभाई शेख यांनी सांगितले कि, प्रशासन दफनभूमीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील तरतुदींचा भंग करीत असून मुस्लिम बांधवांच्या मानवाधिकाराचे उल्लंघन करीत आहे. त्यामुळे समाजामध्ये मोठा असंतोष आहे. त्यामुळे थेरगाव ,काळेवाडी परिसरात दफनभूमीस जागा उपलब्ध करून न दिल्यास प्रशासनाविरोधात मोठे जनआंदोलन उभे करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचे सांगितले.
या बैठकीस आलमगीर मस्जिद वाकड ,गौसिया अरबी मदरसा ,जमाते अंजुमन गुलशन ए राजा ,मदरसा सिरातून नजात ,जमाते सुबानिया ,मदरसा तालीमुल कुराण ,रहमानीया मस्जिद , मक्का मस्जिद , जामा मस्जिद कोकणेनगर ,फैजन ए रजा पवनानगर ,मस्जिद हुजेफा या सर्व मस्जिद मधील प्रमुख व अनेक सामाजिक संस्थानचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी मौलाना अलीम अन्सारी , मौलाना इस्लामउद्दीन , कारी इकबाल ,गुलामभाई शेख ,हाजी दस्तगीर ,तौफिक पठाण ,ताजोद्दीन तांबोळी ,युनूस पठाण यांनी आपले मत मांडले.
सिद्दीकभाई शेख ,समनव्यक ,कब्रस्तान संघर्ष समिती , पिंपरी चिंचवड मो. ९६६५४८४७८६