शिस्तीचे पालन करावे असा आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिला.
प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी तीनवेळा उशीरा (लेट) आल्यास त्यांची एक किरकोळ रजा खर्ची टाकण्यात येणार आहे. महापालिकेचे काही अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन शिस्तीचे पालन करत नाहीत.
प्रभावी व लोकाभिमुख प्रशासन व्यवस्थेसाठी प्रत्येक अधिकारी, कर्मचा-यांनी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. कार्यालयाने नेमून दिलेल्या वेळेत नियमित उपस्थित रहावे. थम्ब, फेस रिडिंग इम्प्रेशन करुन हजेरी पत्रकावर स्वाक्षरी करावी. नियंत्रित अधिकारी यांनी हजेरी पत्रकाची दैनंदिन तपासणी करावी. महापालिका कार्यालयात प्रवेश करताना, उपस्थित असताना ओळखपत्र दर्शनी भागावर लावावे. पदानुसार विहित केलेला गणवेश परिधान करावा. गणवेश परिधान करत नसलेल्या कर्मचा-यांवर कारवाई करावी.
कार्यालयीन वेळेत कामाची जागा सोडून अधिकारी, कर्मचारी इतरत्र फिरत असल्यास, तसेच दुपारी भोजनाच्या सुट्टीनंतर वेळेवर जागेवर उपस्थित रहात नसल्यास अशा कर्मचा-यांवर शाखाप्रमुखांनी शिस्तभंगाची कारवाई करावी. फिरती रजिस्टर विहित नमुन्यात ठेऊन त्यामध्ये फिरतीचे ठिकाणी, कामाचे स्वरुप, बाहेर जाण्याची वेळ व कार्यालयात आल्यानंतर परत आल्याची वेळ नियमितपणे नमूद करावे. नियंत्रित अधिका-यांनी फिरती रजिस्टरची वेळोवेळी तपासणी करुन स्वाक्षरी करावी. पालिकेच्या तपासणी पथकाने नियमितपणे विभागांची तपासणी करावी. तपासणीमध्ये अधिकारी, कर्मचा-यांचे रजा खतावणी रजिस्टर प्रामुख्याने तपासावे. हे रजिस्टर अद्ययावत नसल्यास संबंधित आबारण-वितरण अधिकारी यांना जबाबदार धरुन कार्यवाही करावी.
यापूर्वी बायोमेट्रीक थम्ब इम्प्रेशनद्वारे उपस्थिती नोंदविण्याचे कळविले आहे. ज्या अधिकारी, कर्मचा-यांच्या एका महिन्यात 3 किंवा त्यापेक्षा जास्त वेळेस थम्ब इम्प्रेशन उशीराने केलेले असल्यास त्या अधिकारी, कर्मचा-यांची 3 लेटकरिता एक किरकोळ, अर्जित रजा काटेकोरपणे खर्ची टाकण्याची कारवाई करावी. संबंधित विभागप्रमुखांनी त्यांच्या प्राप्त अधिकारात त्यांच्या अखत्यारीतील अधिकारी, कर्मचा-यांच्या रजा ज्या-त्या कालावधीतच खर्ची टारावे. याबाबत तक्रार अर्ज प्राप्त झाल्यास अशा तक्रारी संबंधित विभाग प्रमुख आस्थापना अधिकारी यांनी त्यांच्या अधिकारातच मुख्यलेखापरीक्षण (अंतर्गत लेखा परीक्षण) विभागाशी समन्वय साधून नियमाधिन योग्य तो निर्णय घ्यावयाचा आहे. असा निर्णय घेताना भविष्यात आक्षेप निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
याबाबत संबंधित अधिकारी, कर्मचारी, आहारण वितरण अधिकारी, विभागप्रमुख हे व्यक्तिश: जबाबदार राहतील. तीन लेट करिता एक किरकोळ रजा ज्या-त्या वर्षी काटेकोरपणे खर्ची टाकण्याची कारवाई करावी. केलेल्या कारवाईचा अहवाल दरमहा 15 तारखेपर्यंत प्रशासन विभागास, दरमहाचे पगार बिलासोबत दाखल सादर करावा. सर्व विभागांनी अधिकारी, कर्मचारी यांचे नाव व पदनामाचे फलक, माहिती अधिकरी म्हणून पदनिर्देशित अधिका-यांचे फलक लावावेत. या सूचनांचे पालन करत नसल्याचे तपासणीमध्ये निदर्शनास आल्यास संबंधित अधिकारी, कर्मचा-यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त पाटील यांनी दिला आहे.