पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील 27 ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक जाहीर झाली

 पोटनिवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात फौजदारी  प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये निर्बंध लागू

प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील 27 ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही पोटनिवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात फौजदारी  प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये निर्बंध लागू करण्यात आले आहेत.पोटनिवडणूक सुरळीत, शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हे निर्बंध राहणार आहेत.



पुणे जिल्ह्यातील 317 ग्रामपंचायतीमधील 503 रिक्त सदस्य पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यापैकी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील 27 ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीची आचारसंहिता 27 डिसेंबर 2021 पर्यंत आहे. 21 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, 22 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे मतमोजणी व निकाल अंतिमरित्या जाहीर करण्याच्या तारखेपर्यंत कलम 144 लागू केले आहे.

या कालावधीत शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात विरूपता करण्यास तसेच निवडणूक कालावधीत सार्वजनिक ठिकाणी संबंधीत पक्षांची चित्रे, चिन्हांचे कापडी फलके, सार्वजनिक ठिकाणी भाषण करण्यास निर्बंध असतील. पोटनिवडणूक कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, सर्व तहसील कार्यालये, सर्व शासकीय कार्यालये व विश्रामगृह याठिकाणी मिरवणूक, मोर्चा तसेच घोषणा, वाद्य वाजविणे व गाणी म्हणणे आदी कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणे यांना बंदी घालण्यात आली आहे.

पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान कोणत्याही वाहनांच्या ताफ्यामध्ये पाचपेक्षा जास्त मोटारगाड्या अथवा वाहने वापरण्यास निर्बंध असतील. कोणतीही व्यक्ती, संस्था, पक्ष कार्यकर्ते यांना ध्वनीक्षेपकाचा (लाऊड स्पीकरचा) वापर सक्षम पोलीस अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय करता येणार नाही. तसेच फिरते वाहन रस्त्यावरून धावत असताना ध्वनीक्षेपकाचा वापर करू नये. ध्वनीक्षेपकाचा वापर कोणत्याही प्रकारे सकाळी 6 पूर्वी व रात्री 10 वाजल्यानंतर करता येणार नाही.

पोटनिवडणूक कालावधीत सर्व धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणांच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापित करता येणार नाहीत. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान कायदा कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र राहणार असल्याचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी कळविले आहे.

कलम 36 प्रमाणे आदेश
महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 36 प्रमाणे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पोटनिवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस ठाणे, चौकी स्वाधीन अधिकारी यांना लेखी अगर तोंडी आदेश देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या जमावाचे अगर मिरवणुकीत व्यक्तीचे वागणे कृत्याबाबत आदेश व ज्या मार्गाने मिरवणूक किंवा जमाव जाईल अगर जाणार नाही. ती वेळ व मार्ग निश्‍चित करण्यासोबतच सार्वजनिक ठिकाणी अगर सार्वजनिक करमणुकीच्या कार्यक्रमाच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या 'लाऊड स्पिकर'च्या ध्वनीची तीव्रता निश्‍चित करून दिलेली वेळ यावर नियंत्रण करणे, मिरवणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने जाहीर सभा घेण्याचे ठिकाण, दिनांक व वेळ याबाबत नियंत्रण करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश 27 डिसेंबर 2021 पर्यंत लागू राहतील, असेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post