पिंपरी : इंडियाच्या 11व्या वरिष्ठ पुरुष हॉकी स्पर्धेचे आयोजन पिंपरीत करण्यात आले

  देशातील स्टार खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी पिंपरी- चिंचवड करांना मिळणार.



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :


पिंपरी :  इंडियाच्या 11व्या वरिष्ठ पुरुष हॉकी स्पर्धेचे आयोजन पिंपरीत करण्यात आले आहे. 11 डिसेंबरपासून सुरू होणा-या या स्पर्धेत हॉकी इंडियाशी संलग्न असलेले 30 राज्य संघटनांचे संघ सहभागी होणार आहेत.स्पर्धेतील सर्व सामने नेहरुनगर, पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर खेळवले जातील. स्पर्धेच्या निमित्ताने देशातील स्टार खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी पिंपरी- चिंचवड करांना मिळणार आहे.

स्पर्धेची माहिती देण्यासाठी काळभोर नगर, चिंचवड येथे आज (बुधवार, दि.01) दुपारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी हॉकी महाराष्ट्राचे सहयोगी उपाध्यक्ष आणि संयोजन समितीचे कार्याध्यक्ष पोलीस आयुक्त कृष्णा प्रकाश, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, हॉकी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मनीष आनंद, हॉकी महाराष्ट्राचे मानद सचिव आणि संयोजन सचिव मनोज भोरे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपाध्यक्ष हितेश जैन, सहाय्यक आयुक्त क्रिडा सुषमा शिंदे तसेच शहरातील माजी हॉकी खेळाडू, पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेची माहिती देताना हॉकी महाराष्ट्राचे सहयोगी उपाध्यक्ष आणि संयोजन समितीचे कार्याध्यक्ष पोलीस आयुक्त कृष्णा प्रकाश म्हणाले, 11 ते 21 डिसेंबर अशी दहा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन हॉकी महाराष्ट्राने केले असून, पिंपरी चिंचवड महापालिका आणि पिंपरी चिंचवड पोलीस सह-आयोजक असतील. स्पर्धेसाठी विभाग अ आणि विभाग ब असे दोन विभाग करण्यात आले आहेत. 30 संघ आठ गटात विभागले असून, अ आणि ब गटात प्रत्येकी तीन तर, अन्य गटात 4 संघाचा समावेश आहे. या स्पर्धेत एकूण 50 सामने होतील. शहरातील हॉकी खेळाडूंना प्रोत्साहन आणि नवीन संधी उपलब्ध करण्यासाठी हॉकी महाराष्ट्र प्रयत्नशील आहे, असे पोलीस आयुक्त कृष्णा प्रकाश म्हणाले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील म्हणाले, शहरातील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियला सर्वोत्तम हॉकी स्टेडियम बनविण्यासाठी पालिकेने परिश्रम घेतले असून, सर्वोत्तम सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. मैदानाचे नूतनीकरण करण्यात आले असून, अत्याधुनिक ब्लू टर्फ बसविण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी पालिका सहयोगी असल्याचा शहर आणि खेळाडूंच्या दृष्टीने मार्गदर्शक आणि लौकिक अर्थाने महत्वाचे आहे, असे आयुक्त पाटील म्हणाले.

स्पर्धेसाठी अभिनव बिंद्रा टार्गेटिंग परफॉर्मन्स (एडीटीपी), डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ पुणे (वैद्यकीय सेवा), युनिक डेल्टा फोर्स सिक्युरिटी (सुरक्षा व्यवस्था), बीव्हीजी (हाउसकिपिंग सुविधा) हे सहयोगी भागीदार राहतील.

Post a Comment

Previous Post Next Post