सातगाव पठार ता. आंबेगाव भागात अवकाळी पावसाने ज्वारी ,कांदा व मेंढपाळ यांचे अतोनात नुकसान.

40 मेंढ्या आणि शेळ्या मरण पावल्यामुळे मेंढपाळ शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 पेठ - सातगाव पठार ता. आंबेगाव भागात अवकाळी पावसाने ज्वारी ,कांदा व मेंढपाळ यांचे अतोनात नुकसान झाले आहे.रात्रभर संततधार पाऊस सुरु असताना अचानक थंडीची हुडहुडी वाढली आहे.या थंडीचा सर्वाधिक फटका पाळीव जनावरांना बसलेला आहे. सातगाव पठार भागातील वास्तव्याला असलेल्या पारनेर तालुक्यातील एका मेंढपाळाच्या जवळपास 12 पेक्षा जास्त शेळ्यामेंढ्यांचा मृत्यु झाला आहे. तसेच पेठ पारगाव भागात मध्ये सुद्धा अन्य मेंढपाळांच्या 30 मेंढ्या मरण पावल्या आहेत. एकूण जवळपास 40 मेंढ्या आणि शेळ्या मरण पावल्यामुळे मेंढपाळ शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

पावसाची संततधार आणि थंडीची हुडहुडी यामुळे शेळया मेंढ्यांचा मृत्यु झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडुन व्यक्त करण्यात आला असुन जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकिय विभाग आणि महसूल विभागाकडून तातडीने पंचनामे करण्याचे काम सुरु आहे.

‌ तसेच सातगाव पठार भागातील भावडी ,थुगाव पेठ आदी भागात अनेक ठिकाणी पूर्ण वाढ झालेल्या ज्वारी पिकाचे पीकाचे नुकसान झाले असून ज्वारी पीक काढणीला काही दिवस राहिले असताना भुईसपाट झाले आहे. त्यामुळे धान्य आणि कडबा या दोन्ही गोष्टींचे नुकसान झाले आहे.

ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसामुळे कांदा पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. काढणीस आलेला कांदा सडण्याची भीती यामुळे निर्माण झाली आहे. त्यामुळे अवकाळी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटलेले कुठेतरी दिसून येत आहे. पाऊस ऊन ,धुके, ढगाळ वातावरण अचानक वाढणार गारवा असे प्रकार सध्या सुरू आहे अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे रब्बी हंगामातील कांदा, बटाटा, गहू, हरभरा पिके धोक्यात आली आहे पिकावर रोगराई पसरण्याची शक्यता व्यक्त होत आहे कांदा पिकावर तसेच बटाटा या पिकांवर अतिरिक्त फवारणीचा खर्च शेतकरीवर्गाला करावा लागल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कुठेतरी कोलमडत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post