प्राध्यापकाला गंडविल्याची तक्रार पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल .
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पंढरपूर : मोबाईलचा रिचार्ज झाला नाही म्हणून त्याची खातर जमा करण्यासाठी धडपडत असलेला प्राध्यापक ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या चोरांच्या जाळ्यात अडकला. सदर भामटय़ाने प्राध्यापकाशी गोड संवाद साधत 2 लाख 41 हजार रुपये खात्यातून काढून घेतले.बँकेचा अधिकारी बोलतोय', असा आभास निर्माण करून चोरटय़ाने उच्च शिक्षित प्राध्यापकाला गंडविल्याची तक्रार पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. सतीश सुभाष चव्हाण (वय 29, रा. कासेगाव, ता. पंढरपूर) असे फसवणूक झालेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. चव्हाण हे अभियांत्रिकी महाविद्यालयात नोकरी करीत आहेत.
प्राध्यापक चव्हाण यांनी 2 डिसेंबरला आपल्या मोबाईलवरून जिओ कंपनीचा 239 रुपयांचा रिचार्ज केला. मात्र, तो झाला नाही. त्यानंतर रिचार्ज का झाला नाही म्हणून त्यांनी 6 डिसेंबरला तक्रार करण्यासाठी त्यांनी गुगलवरून इंड्सइंड बँकेचा कस्टमर केअर नंबर घेतला आणि फोन केला. तो कॉल रिसीव्ह झाला नाही. त्यानंतर थोडय़ा वेळात त्यांच्या मोबाईलवर 917857815751 या नंबरवरून फोन आला. समोरच्या व्यक्तीने त्यांना आपण इंड्सइंड बँकेतून बोलत आहे, तुमची काय तक्रार आहे, असे विचारले.
त्यानंतर प्राध्यापकांनी समोरच्या व्यक्तीच्या मागण्यावरून, बँकेतील खाते अपडेट करण्याची गरज आहे. मी तुम्हाला लिंक पाठवतो, त्यावरील माहिती भरा म्हणून त्यांना लिंक पाठवली. या लिंक क्लिक केल्यावर त्यावर त्यांचे नाव, युझर आयडी, आएमपीएनएस 6 डिझीट घेतले आणि तुमच्या फोनवरील खाते अपडेट होत आहे, असे सांगून ओटीपी मागून घेतला. यानंतर त्यांच्या खात्यामध्ये पैसे काढून घेण्यास सुरुवात केली. चार वेळा विविध रकमा काढून घेताना प्राध्यापकांनी आलेला ओटीपी भामटय़ाला सांगितला. 'पैसे का काढता', असे विचारताच खाते अपडेट होत आहे पुन्हा खात्यात पैसे येतील, असे त्याने असे सांगितले. 2 लाख 41 हजार काढून भामटय़ाने मोबाईल बंद केला. या प्रकरणी प्राध्यापक चव्हाण यांनी तत्काळ इंड्सइंड बँकेत जाऊन घडला प्रकार सांगितला. दरम्यान, फसवणूक झाल्याची तक्रार चव्हाण यांनी दिली आहे.