भाजप आमदार नीतेश राणे यांचे निलंबन करा , शिवसेना आमदारांनी घेतला आक्रमक पवित्रा

 नीतेश राणे चांगलेच कोंडीत सापडले आहेत,

कोणालाही सोडणार नाही.....गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई 


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

विधिमंडळाच्या आवारात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे भाजप आमदार नीतेश राणे यांचे निलंबन करा, या मागणीसाठी शिवसेना आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला.याचवेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान संतोष परब यांच्यावरील जीवघेण्या हल्ला प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करा, अशी मागणीही शिवसेना सदस्यांनी लावून धरल्याने नीतेश राणे चांगलेच कोंडीत सापडले आहेत. निलंबनाच्या मागणीवर आज उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या दालनात बैठक होणार असून सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रकरणातील कोणालाही सोडणार नाही, असा इशारा गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिला आहे.

विधानसभेच्या कामकाजातील प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरे यांच्याविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल नीतेश राणे यांच्याविरोधात निलंबनाच्या कारवाईची मागणी केली. नीतेश राणे यांनी आमच्या नेत्यांचा अवमान केला आहे. आम्ही हा अवमान खपवून घेणार नाही. जसे तुमच्यासाठी मोदी आहेत तसेच आमच्यासाठी आदित्य ठाकरे आहेत. एक तर नीतेश राणेंनी झाल्या प्रकाराबद्दल हात जोडून माफी मागावी अन्यथा त्यांना सभागृहातून निलंबित करावे, अशी मागणी सुहास कांदे यांनी केली.

तेव्हाच चंद्रकांतदादा, फडणवीसांनी रोखलं असतं तर अशी हिंमत झाली नसती - भास्कर जाधव

यावेळी भास्कर जाधव यांनीही आक्रमकपणे भूमिका मांडली. कोणत्याही पक्षाच्या नेत्याबद्दल असं बोलणं योग्य नाही. मी मोदींबद्दल बोललो तेव्हा मी माफी मागितली. तुमच्यासाठी जसे मोदी आहेत तसेच आमच्यासाठी आदित्य ठाकरे आहेत. त्यामुळे नीतेश राणेंना कायमस्वरूपी निलंबित करा, अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. मागील अधिवेशनात आमदारांच्या निलंबनानंतर भाजपकडून विधानसभेच्या पायऱयांवर अभिरूप विधानसभा भरविण्यात आली. यावेळी नीतेश राणे यांनी चंद्रकांतदादांना उद्देशून म्हटलं, दादा, मी इथे असंसदीय शब्द बोलतो. भास्कर जाधव म्हणजे काय? त्याला कुणी तरी सांगितली दोन बिस्किटं देतो, जा त्याला चावून ये. त्याला चावून येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव, असे नितेश राणे बोलले. यू टय़ूबवरील क्लिपमध्ये हे स्पष्ट दिसत आहे. पण त्यावेळी चंद्रकांत पाटील किंवा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना रोखले नाही. त्यावेळी जर रोखले असते तर आज अशा प्रकारे कोणत्याही नेत्याबद्दल आक्षेपार्ह कृती करण्याची त्यांची हिंमत झाली नसती, असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला.

चुकीला माफी नाही - सुनील प्रभू

शिवसेना मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनीही नीतेश राणे प्रकरणावरून विरोधकांवर हल्ला चढवला. ज्या दिवशी हा प्रकार घडला तेव्हा हा मुद्दा उपस्थित केला होता. तेव्हाही सर्वांनुमते ठरले की नेत्यांबाबत नीट बोलले पाहिजे; पण झाल्या प्रकाराबद्दल माफी मागणे सोडाच, नीतेश राणे वाहिन्यांसमोर जाऊन या कृतीचे समर्थन करतात, हे योग्य नाही. चुकीला माफी नाही. त्यामुळे नीतेश राणेंना निलंबित केलेच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका सुनील प्रभू यांनी मांडली.

सभागृहात गोंधळ, कामकाज तहकूब

भास्कर जाधव यांनी चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी नींतेश राणे यांना रोखण्याबाबत विधान केले असता सभागृहात गोंधळ उडाला. देवेंद्र फडणवीस यांनी, आम्ही नीतेश राणे यांच्या वक्तव्याचे समर्थन करीत नाही, पण ठरवून भाजपच्या एका सदस्याला निलंबित केले जात असल्याचा आरोप केला. यावर गोंधळ वाढला. दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी वेलमध्ये धाव घेतल्याने सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

मंगळवारी बैठक

सभागृह सुरू झाल्यानंतर भास्कर जाधव यांनी पुन्हा आपले म्हणणे मांडले. यावेळी मंत्री नवाब मलिक यांनी वारंवार एखादा सदस्य चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर त्याची दखल घेणे गरजेचे आहे. हा सदस्य सभागृहात नसेल तर त्याचा खुलासा मागवून घ्या. जर ते दिलगिरी व्यक्त करीत नसतील तर निलंबित करा, अशी मागणी केली. यावर बोलताना तालिका अध्यक्ष संजय शिरसाट यांनी, कोरोनाकाळात अधिवेशन कमी दिवसांचे आहे. त्यात गोंधळ झाला तर जनतेत वेगळा संदेश जाईल असे सांगताना निलंबनाबाबत मंगळवारी बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले.

शिवसेना मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान 18 डिसेंबर रोजी संतोष परब यांच्यावर खुनी हल्ला झाल्याची बाब माहितीचा मुद्दा उपस्थित करीत सभागृहासमोर मांडली. अद्यापही आरोपी सापडलेले नाहीत. आमदार वैभव नाईक हे कणकवली पोलीस ठाण्यात निवेदन घेऊन गेलेत. या प्रकरणात ज्यांची नावे आहेत त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी, गृह विभागाने या घटनेची गंभीर दखल घेतली असल्याचे सांगितले. कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. पोलीस अधीक्षक स्वतः या प्रकरणाचा तपास करीत आहेत. एका आरोपीला दिल्लीतून अटक केली आहे. कोणत्याही आरोपीला पोलिसांकडून सोडले जाणार नाही, अशी ग्वाही शंभुराज देसाई यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post