पाटर्य़ा टाळून नववर्षाचे स्वागत घरातच करा...आयुक्त.
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
थर्टी फर्स्ट पाटर्य़ांचे नियोजन करणाऱ्यांना पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी कडक इशारा दिला असून, दोन डोस झालेले असतील तरच कुठल्याही कार्यक्रम-समारंभात सहभागी होता येईल, असे बजावले आहे.तसेच कुठल्याही कार्यक्रमात कोरोना खबरदारीचे नियम मोडल्याचे आढळल्यास पोलिसांच्या सहाय्याने कठोर कारवाई होणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. शिवाय पाटर्य़ा टाळून नववर्षाचे स्वागत घरातच करा, असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे.
गेल्या 20 महिन्यांपासून कोरोनाच्या सावटाखाली असणाऱया नागरिकांनी कोरोना आटोक्यात येताच पुन्हा नियम मोडण्यास सुरुवात केल्याचे निदर्शनास येत आहे. विशेष म्हणजे कार्यक्रमांमध्ये गर्दीत नियम धाब्यावर बसवून धोकादायक गर्दी होत आहे. यातच वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हेरिएंट ओमायक्रोनचाही धोका वाढल्याने मुंबईचे टेन्शन वाढले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत पालिकेने आतापासूनच खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.
… हे नियम लक्षात ठेवा
- बंदिस्त सभागृहांमध्ये होणाऱया कोणत्याही कार्यक्रमांसाठी सभागृहाच्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के व्यक्तींनाच उपस्थितीची परवानगी.
- खुल्या जागेतील कार्यक्रमांसाठी सदर जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के संख्येनेच उपस्थितीला परवानगी.
- खुल्या जागेतील कार्यक्रमास एक हजारांवर व्यक्ती एकत्र येत असतील तर स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला सूचना द्यावी.
- हॉटेल्स, सिनेमागृह, शासकीय-खासगी आस्थापनांना कोविड प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी बंधनकारक.
- सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह सार्वजनिक ठिकाणी लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच प्रवेशाची मुभा.
अशी होणार कारवाई
पाटर्य़ा, समारंभ-कार्यक्रमांमध्ये कोविड प्रतिबंधक नियम मोडल्याचे निदर्शनास आल्यास पालिकेच्या विभाग कार्यालयाकडून आणि पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येईल. भारतीय दंड विधान संहितेनुसार कायदेशीर कारवाई होईल. शिवाय साथरोग व्यवस्थापन कायदा आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
सुरक्षित अंतर राखा, मास्कचा वापर करा. वारंवार हात धुवा. परिसर, खोल्या, प्रसाधनगृहे यांचे वेळोवेळी सॅनिटायझेशन करा. लसीकरण वेळेत करून घ्यावे.
ओमायक्रोनमुळे अनेक देशांमध्ये परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लॉकडाऊनची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे प्रचंड गर्दीच्या मुंबईतही खबरदारी घेण्याची गरज आहे. त्यामुळे नागरिकांनी, सेलिब्रेटींनी परिस्थितीचे भान ठेवून वागायला हवे!
मुंबईच्या डोक्याला ताप, बूस्टर डोस घेऊनही ओमायक्रोन
राज्यात ओमायक्रोन रुग्णांची संख्या 48 वर पोहोचली असताना मुंबईत आलेल्या एका प्रवाशाला बूस्टर डोस घेऊनही ओमायक्रोनची लागण झाल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. हा 29 वर्षीय रुग्ण अमेरिकेहून मुंबईत आला आहे. तीन डोस घेऊनही त्याला ओमायक्रोनची लागण झाल्याने मुंबईसाठी टेन्शन निर्माण झाले आहे.
संबंधित रुग्णाला पालिकेच्या अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र या रुग्णामध्ये कोणतीही लक्षणे नसून त्याची प्रकृती उत्तम असल्याची माहितीही पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या दोन जणांच्या कोरोना चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, 18 डिसेंबरपर्यंत मुंबईतील ओमायक्रोन बाधितांची संख्या 19 वर पोहोचली आहे.