प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी आपल्या मतदारसंघात म्हणजेच वाराणसीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याबद्दल वक्तव्य केलं होतं. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवाजी महाराजांचं साम्राज्य आणि हिंदुत्वाबद्दल वक्तव्य केलं आहे.यानंतर मात्र राज्यात वादाला सुरूवात झाली आहे. काॅंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जहरी टीका केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानं महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला आहे. शिवराय, फुले, शाहुंच्या महाराष्ट्राला धर्मांद बनवण्याचा प्रयत्न पाटील यांनी चालवला आहे. चंद्रकांत पाटील हे पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला व्हायरस आहेत, अशी खरमरीत टीका अतुल लोंढे यांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महारांज यांनी कधीही एका जाती धर्माला थारा दिला नाही. सर्व जाती धर्मांनासोबत घेऊन छत्रपतींनी हे साम्राज्य उभं केलं होतं. छत्रपतींच्या सैन्यात सर्व धर्मांच्या सैनिकांचा समावेश होता. छत्रपती शिवाजी महारांजाचा संबंध हिंदु व्होट बॅंकेशी जोडून पाटील यांनी अकलेचे तारे तोडले आहेत, अशी टीका लोंढे यांनी केली आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपण काही चुकीचं बोललं नसल्याचं स्पष्टीकरण पाटील यांनी दीलं आहे. तर भाजप छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर आपल्या राजकारणासाठी करत आहे, अशी टीका विरोधी पक्षांनी केली आहे.