मुंबई - शिवसेनेचे नेते आणि राज्यातील मंत्री अनिल परब यांनी अनधिकृतपणे सीआरझेडमध्ये बांधकाम केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर आता लवकरच या बेकायदेशीर रिसॉर्टवर हातोडा पडेल, असा दावा सोमय्या यांनी केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनिल परब यांना वाचवण्याचे खूप प्रयत्न केले असल्याची टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे. मात्र पर्यावरण मंत्रालयाने अनिल परब यांना नोटीस पाठवली असून त्यांना 3 तारखेपर्यंत या नोटिसीला उत्तर द्यावे लागणार असल्याचेही किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. 5 ते 7 तारखेपर्यंत रिसॉर्ट तोडण्याचे आदेश राज्य सरकारकडे येतील, असे भाकितही सोमय्या यांनी केले.
उद्धव ठाकरे यांनी अनिल परबांच्या अनधिकृत रिसॉर्टकडे कुणाचे लक्ष जाऊ नये, त्याची चर्चा होऊ नये, यासाठी नवाब मलिकांना कामाला लावले असल्याचा आरोप सोमय्यांनी केला.18 नेते आणि मंत्री यांची चौकशी आणि कारवाई सुरु आहे. आतापर्यंत एकूण 28 घोटाळे बाहेर आले आहेत. येत्या महिन्याभरात 4 मंत्र्यांचे 4 नवे घोटाळे बाहेर काढणार असल्याचा दावाही किरीट सोमय्या यांनी यावेळी केला आहे.
परब यांच्या रिसॉर्ट प्रकरणात सोमय्या यांनी लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. त्यादरम्यान, दापोलीतील अनिल परबांच्या रिसॉर्टप्रकरणी बिगरशेती परवाना रद्द केल्याचे प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र सरकारने लोकायुक्तांकडे सादर केले होते.