फडणवीस यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्यात आले
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
निवडणूक प्रतिज्ञा पत्रात आपल्यावर दाखल दोन फौजदारी गुह्यांची माहिती लपविल्या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच अडचणीत आले आहेत. याप्रकरणी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी कोर्टात फडणवीस यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्यात आले आहेत.2014 च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज भरताना दोन गुह्यांची माहिती लपवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. नागपूरमधील अॅड. सतीश उके यांनी याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली होती. या संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सुरू करण्यात आलेली न्यायलयीन प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. फडणवीस यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्यात आले आहेत.
काय आहे प्रकरण ?
फडणवीस नागपूरचे महापौर असताना त्यांनी एका जमिनीच्या प्रकरणात काही निर्णय घेतले होते. त्यासंदर्भातच त्यांच्या विरोधात दोन खटले दाखल झाले होते. त्या प्रकरणांत फडणवीस यांना जामीन मिळवला होता. मात्र, त्यांनी विधानसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात या दोन्ही प्रकरणांचा उल्लेख केला नाही.
दोषी आढळल्यास 6 महिन्यांची शिक्षा
या प्रकरणात दोषी आढळल्यास 6 महिन्यांची शिक्षा किंवा दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. फौजदारी खटल्यात आरोप निश्चित होणे आणि त्याची माहिती आरोपीला दिली जाणे ही सामान्य प्रक्रिया आहे. त्यानुसार फडणवीसांनाही माहिती देण्यात आल्याचे त्यांचे वकील उदय डबले यांनी म्हटले आहे.