प्रेस मीडिया वृत्तसेवा :
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचा भार हलका करण्याच्या उद्देशाने बालभारती एक पुस्तकी योजना राबवणार असून पहिलीच्या चार विषयांसाठी एकच पाठय़पुस्तक तयार करण्यात येणार आहेत.या पुस्तकात मराठी, इंग्रजी, गणित व 'खेळू आणि शिकू' हे विषय एकत्रितपणे असतील.
पुढील वर्षी फक्त पहिलीसाठी एक पुस्तक योजना राबविण्यात येणार असली तरी भविष्यात प्राथमिक शाळेतील सर्व इयत्तांच्या विषयांसाठी देखील एकच पाठय़पुस्तक तयार केले जाणार आहे. पहिलीतील सहा वर्षे वयाच्या विद्यार्थ्याच्या दप्तरात सुमारे 830 ग्रॅम वजन असलेली पाठय़पुस्तके असतात. यासह खाऊचा डबा, पाण्याची बाटली, कंपासपेटी, इतर शालोपयोगी सामानही दप्तरात असतेच, मात्र भविष्यात सर्व विषयांसाठी असलेल्या एकाच पाठय़पुस्तकामुळे दप्तरातील वजनाचा भाग हा 210 ग्रॅमने हलका होणार आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील 488 शाळांमध्ये ही एक पुस्तक योजना सुरू करण्यात आली असून त्याला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे बालभारतीचे संचालक विवेक गोसावी यांनी स्पष्ट केले.
पाठय़पुस्तकातील हा बदल राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2021 नुसार करण्यात आला आहे. राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही पाठय़पुस्तके मोफत मिळणार असून दुर्गम भागात घरापासून शाळा लांब असल्याने पायी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे यामुळे नक्कीच कमी होणार आहे.
पहिली घटक चाचणी, प्रथम सत्र परीक्षा, दुसरी घटक चाचणी, द्वितीय सत्र परीक्षा अशा चार भागांतील अभ्यासक्रमाप्रमाणे पाठय़पुस्तकाची रचना असेल. चारही परीक्षांसाठी स्वतंत्र पाठय़पुस्तक असणार आहे. विद्यार्थ्यांना सत्रानुसार आवश्यक पाठय़पुस्तकच आणावे लागणार आहे.