गेल्या सुमारे दोन वर्षांच्या कालावधीत भारतासह जगात सर्वत्र धुमाकूळ घालणारा करोना विषाणू परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे, असे वाटत असतानाच या घातक विषाणूचा त्या पेक्षाही घातक असा प्रकार आता समोर आल्यामुळे जगात सर्वत्रच पुन्हा एकदा भीतीचे सावट निर्माण झाले आहे.या विषाणू बाबत अनेक उलटसुलट गोष्टी प्रसिद्ध होत असल्यामुळे नागरिकांच्या मनात अनामिक भीती घर करू पाहत आहे.
या भीतीतूनच आता काही बळीही जाऊ लागले आहेत. उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात अशीच एक घटना घडली आहे. ज्यामुळे लोकांच्या मनातील या विषाणूच्या भीतीची तीव्रता किती प्रचंड आहे हे समोर येते. कानपूर शहरात एका डॉक्टरांनी या विषाणूच्या भीतीमुळे घरातील सर्व लोकांची हत्या करून स्वत: शेवटी आत्महत्या केली. त्याने जी चिठ्ठी ठेवली होती ती पुरेशी बोलकी होती.
'यापुढे मला आता करोनामुळे मेलेल्या लोकांचे मृतदेह मोजायचे नाहीत. हा नवीन विषाणू सर्वांना मारून टाकेल. मला कोणतेही भविष्य नाही.' अशा आशयाची चिठ्ठी लिहून या डॉक्टरांनी आत्महत्या केल्यामुळे निश्चितच खळबळ माजली आहे. ज्या डॉक्टरांनी पेशंटला वाचवण्याचे किंवा धीर देण्याचे काम करायचे त्या डॉक्टर्सनी जर अशाप्रकारे माघार घेतली आणि पराभव पत्करला, तर सामान्य नागरिकांनी करायचे तरी काय?
या प्रश्नाचे उत्तर आता शोधावे लागेल. गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये जेव्हा जगात सर्वत्र करोना विषाणूचा प्रसार होत होता तेव्हा ज्या प्रकारची एक अनिश्चित आणि संशयाची परिस्थिती तयार झाली होती आणि नक्की काय चालले आहे हे कोणालाच कळत नव्हते त्याच प्रकारची परिस्थिती पुन्हा एकदा या ओमायक्रॉन नावाच्या विषाणूने निर्माण केली आहे. या बाबत जे काही संशय आणि शंका आहेत त्या दूर करण्याची जबाबदारी सरकारला निश्चितच घ्यावी लागणार आहे.
पण दररोजच सरकारचे प्रतिनिधी आणि काही वैद्यकीय तज्ज्ञ फक्त माध्यमांवर उलटसुलट मते व्यक्त करत असल्याने सर्वत्र संशयाचे वातावरण आहे. त्यातूनच अशा प्रकारची भीती निर्माण होत आहे. खरे तर सर्वत्र दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. सर्वात शेवटी सुरू झालेले शैक्षणिक व्यवहार मार्गी लागला, असे वाटत असतानाच पुन्हा एकदा जर शैक्षणिक व्यवहार बंद झाले तर एका पिढीचे मोठे नुकसान होणार आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीप्रमाणे ओमायक्रॉन या विषाणूचा प्रसार जरी वेगाने होत असला, तरी या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. मुळात करोनाच्या काळातही मृत्यूचे प्रमाण 4 टक्क्यांच्या वर कधी गेले नव्हते. करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये लसीकरणाचे कवच उपलब्ध नव्हते. योग्य औषधे उपलब्ध नव्हती. सर्वत्र गोंधळाचे वातावरण होते.
म्हणून त्या लाटेमध्ये आणि नंतर निष्काळजीपणामुळे निर्माण झालेल्या दुसऱ्या लाटेमध्ये काही बळी जरी गेले असले तरी रुग्ण आणि मृत्यू यांचे प्रमाण खूपच कमी होते. ओमायक्रॉनच्या बाबतीत हे प्रमाण त्यापेक्षाही कमी असेल असे म्हटले जात आहे. एकीकडे केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी सर्व प्रकारची तयारी केली असली, तरी सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील भीती घालविण्यास प्राधान्य द्यावे लागेल.
या विषाणूचा संसर्ग न होताही कोणाचे अशा प्रकारचे बळी जात असतील, तर ते परवडणारे नाही. सध्या जगातील दक्षिण आफ्रिका आणि युरोपमधील ज्या भागांमध्ये ओमायक्रॉन विषाणूचा झपाट्याने प्रसार होत आहे. तेथील परिस्थिती पाहून तेथील रुग्णांच्या लक्षणांचा अभ्यास करून खरी माहिती भारतीय नागरिकांसमोर मांडण्याची गरज आहे.
कोणत्याही रोगाला प्रतिबंध करणे हाच रोगावरील सर्वोत्तम उपचार असतो, ही म्हण आतापर्यंत सर्वांनाच ठाऊक झाली आहे. त्यामुळे एकीकडे सरकारने जरी या रोगाचा भारतात प्रसार होऊ नये याबाबत सर्व उपचार आणि उपाययोजना केल्या असल्या तरी त्याच वेळी याबाबत खरे प्रबोधन लोकांना करणे, हे सर्वात महत्त्वाचे आहे. पण सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर चुकीची माहिती प्रसिद्ध होत असल्याने आणि त्या माहितीवर विश्वास ठेवण्याचा सर्वसाधारण स्वभाव असल्याने त्यातूनच अशा प्रकारची एक अनामिक भीती निर्माण होत आहे.
करोनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये केंद्र सरकारच्या आरोग्य विभागातर्फे दररोज पत्रकार परिषद घेऊन करोना परिस्थितीची माहिती प्रसारित केली जात होती. ही प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करण्याची गरज आहे. महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यामध्येही ओमायक्रॉनचा विषाणू दाखल झाल्याची अधिकृत माहिती जाहीर केली आहे. हा विषाणू महाराष्ट्रात आला असला तरी कोणत्याही प्रकारचे नव्याने निर्बंध लागू करण्याची गरज नाही अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली असली,
तरी याबाबत दररोज अधिकृत माहिती प्रसारित करून लोकांच्या मनात कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही याची काळजी सरकारला घ्यावीच लागेल. वैद्यकीय क्षेत्राशी कोणताही संबंध नसलेले काही संख्याशास्त्रज्ञ सध्या केवळ संख्याशास्त्राच्या आधारे जानेवारी महिन्यात तिसरी लाट निर्माण होऊ शकते येऊ शकते अशा प्रकारचे भाकीत करत आहेत. पण असे भाकीत केल्यामुळेही मोठ्या प्रमाणावर भीती निर्माण होते, हेही लक्षात घेण्याची गरज आहे. भारतीय नागरिकांनी जी लस घेतली आहे किंवा जगात इतरत्रही जेथे लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली
आहे ती लस या नव्या विषाणूवर प्रभावी नाही, अशा प्रकारची मतेही मांडली जात आहेत. म्हणजेच जर पुन्हा एकदा नवीन लस येईपर्यंत हा विषाणू थैमान घालणार असेल तर नागरिकांच्या मनातील भीतीचे प्रमाण किती वाढेल याबाबत अंदाज बांधता येऊ शकतो. सरकारने कोणत्याही प्रकारची उलट-सुलट किंवा चुकीची माहिती प्रसिद्ध करण्याबाबत बंधने घालण्याची हीच वेळ आहे आणि कोणताही विषाणू असला तर त्याला प्रतिबंध करण्यासाठी काही उपाय योजना असू शकतात आणि त्या उपायांचा अवलंब केला तर संसर्ग होणार नाही