आपात्कालीन परिस्थिती उद्भवल्यास शिक्षण मंडळाकडे मूल्यांकनाचा दुसरा फार्म्युला देखील तयार .
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
राज्यात ओमायक्रोनचा धोका हळूहळू वाढत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात रुग्णसंख्या वाढल्यास दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा कशा होणार..? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ापासून होण्याची शक्यता असून त्यावेळी कोरोनाची स्थिती पाहूनच निर्णय घेतला जाईल, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.तसेच आपात्कालीन परिस्थिती उद्भवल्यास शिक्षण मंडळाकडे मूल्यांकनाचा दुसरा फार्म्युलादेखील तयार असून सर्व पर्यायांची चाचपणी करूनच मंत्रालय स्तरावर निर्णय घेतला जाणार आहे.
दहावीचे परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य शिक्षण मंडळाने दहावीचे ऑनलाइन परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थी नियमित शुल्कासह 20 डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. त्यानंतर अर्ज करणाऱया विद्यार्थ्यांकडून विलंब शुल्क आकारण्यात येणार आहे. विलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत 28 डिसेंबरपर्यंत आहे. विद्यार्थी बोर्डाच्या www.mahahsscboard.in या वेबसाईटवरून अर्ज सादर करू शकतात.
दहावी-बारावीच्या लेखी परीक्षांचे आयोजन करण्याची शिक्षण मंडळाची तयारी झाली आहे. परीक्षांचे वेळापत्रकही तयार असून केवळ शासन मान्यतेची प्रतीक्षा आहे. परीक्षा पेंद्र, कोरोना प्रतिबंधक खबरदारी, अंतर्गत, बर्हिगत परीक्षक यासंबंधीची माहिती शाळांकडून मागविण्यात आली आहे.
कोरोनाच्या तिसऱया लाटेमुळे लेखी परीक्षा न झाल्यास शिक्षण मंडळाकडे मूल्यमापनाचा दुसरा पर्याय तयार आहे. सीबीएसईप्रमाणे राज्य मंडळाने दहावी-बारावीसाठी अद्याप सेमिस्टर पद्धत अवलंबली नसली तरी शाळा स्तरावर आतापर्यंत घटक चाचणी आणि प्रथम सत्र परीक्षा झाली आहे. दुसऱया सत्राची परीक्षादेखील घेण्यात येणार आहे. या परीक्षा आणि वर्षभरातील कामगिरीच्या आधारे मूल्यांकन करण्याचा विचार होऊ शकतो.
शाळास्तरावर घेतल्या जाणाऱया परीक्षांसोबतच मूल्यमापनाच्या आणखी काही पर्यायांवरही शिक्षण मंडळाने विचार केला आहे. सध्या तरी याविषयी कोणतीही माहिती देण्यास बोर्ड उत्सुक नसून दहावी-बारावीच्या परीक्षांचे भवितव्य हे येणाऱया परिस्थितीवरच अवलंबून आहे.
आजच्या घडीला परीक्षा घेण्यावर ठाम
दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा घेण्यासाठी राज्य शिक्षण मंडळ सज्ज असून आजच्या घडीला परीक्षा घेण्यावर ठाम आहोत. राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात दहावी-बारावीच्या शाळा व्यवस्थित सुरू आहेत. विद्यार्थी उपस्थितीही चांगली आहे. शालेय शिक्षण विभागाकडून दहावी-बारावी परीक्षेच्या वेळापत्रकांची घोषणा लवकरच केली जाईल. परीक्षा घेण्याच्या काळात कोरोनामुळे काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर परीक्षेसाठी दुसऱया पर्यायाचा विचार होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी सध्या दुसरा कोणताही विचार न करता केवळ आपल्या अभ्यासावर लक्ष पेंद्रित करणे आवश्यक आहे.
- शरद गोसावी, प्रभारी अध्यक्ष, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ