भारताच्या पहिल्या सुपरस्टारचा वाढदिवस

'मेरे फॅन्स कभी मुझे छोडके नही जा सकते....


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

२९ डिसेंबर १९४२ रोजी जन्म घेणार्‍या जतिंदर चुन्नीलाल खन्ना चा जन्म अमृतसरमध्ये झाला. देशाच्या फाळणीनंतर खन्ना कुटुंब मुंबईत गिरगावात रहायला आले. गिरगावच्याच सेंट सेबेस्टिअन हायस्कूलमध्ये शिक्षण घेता घेता जतिंदर लहानाचा मोठा झाला. घरात लाडका असलेला जतिंदरला आई वडीलांनी काहीही कमी पडू दिले नाही. शाळा संपली आणि जतिंदरला पुढच्या शिक्षणासाठी वडीलांनी पुण्यात पाठवलं, तिथे त्याला फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता पण तो त्याला मिळाला नाही त्यामुळे त्याला पुण्यातील वाडिया काॅलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागला बी ए साठी पण पुण्यात जतिंदर रमला नाही. पुढे दोनच वर्षांनी तो मुंबईत परत आला आणि तिथे त्यानं के.सी. काॅलेजला शेवटच्या वर्षाला प्रवेश घेतला. अंतर्यामी असलेली अभिनयाची ओढ आता त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. काॅलेजमधील त्याच्या एका मित्राने त्याला INT Drama कंपनी जाॅईन करायला सांगितली तिथे होते दिग्दर्शक  व्ही. के. शर्मा . त्यांनी जतिंदर मधील टॅलेंट ओळखून त्याला एका नाटकात छोटासा रोल दिला, पण एका ओळीचा अभिनय वाट्याला आलेल्या जतिंदर ने ती ओळ पण धड नीट म्हटली नाही, याचं जतिंदरला खूप वाईट वाटलं, पुढे त्याला सत्यदेव दुबे यांच्या अंधा युग नाटकामध्ये काम करायला मिळाले, त्याने जतिंदर एवढं नाव लावायच्या ऐवजी जतिन लावायला सुरुवात केली, याच दरम्यान एका नाटकाच्या निमित्ताने त्याची अंजू महेंद्रु या अभिनेत्रीशी ओळख झाली, पुढे पहा ७ वर्षे हे नातं फारच क्लोज रिलेशनशीप मध्ये राहिलं,  दरम्यान फिल्मफेअर आणि शक्ती सामंता, बी आर चोप्रा, जी पी सिप्पी आणि अजून चौघांनी मिळून स्थापन केलेल्या युनायटेड प्रोड्युसर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन अभिनेत्याच्या शोधासाठी एक स्पर्धा आयोजित केली होती ,त्यात सबंध भारतातून जतिन खन्ना अभिनयात पहिला क्रमांकावर आला आणि सुरु झाला एक नवीन अभिनयाचा प्रवास... 

सिनेमात जायचं असेल तर तुला तुझं नाव बदलायला हवे असे त्याच्या मामाने के के तलवारने त्याला सांगितले आणि त्याचं नाव बदलून त्याच्या मामाने जतिनचे खन्ना चे राजेश खन्ना ठेवले. त्याला घरी 'काका' असे संबोधले जात असताना फिल्मी दुनियेत पण हा राजेश खन्ना काका याच नावाने ओळखला जातो, काका म्हणजे पंजाबमध्ये लहान गोंडस मुलगा, सुरवातीला चेतन आनंद यांनी 'आखरी खत' मध्ये जरी त्याला सिनेमाच्या पडद्यावर उतरवले असले तरीही त्याची पहिली साईन केलेली फिल्म होती जी पी सिप्पी यांची 'राझ' , सुरवातीला ३-४ फिल्म अजिबातच न चालल्याने तो एकदम अन नोटिस झाला, पुढे त्याला शक्ती सामंता यांचा 'आराधना ' मिळाला आणि १९६९ पासून  सुरु झाली एक स्वप्नवत वाटचाल, त्या आधीच त्याने बी आर चोप्रा यांच्या ' इत्तेफाक ' ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते, आराधनाने त्याला एका रात्रीत या फिल्म इंडस्ट्री आणि अखिल भारतीय पातळीवर सुपरस्टार बनवले, ही फिल्म १०० आठवडे चालली, तसेच ब्रह्मदेश, नेपाळमध्ये पण सिल्व्हर ज्युबिली हीट झाली... पुढे त्याची सुपरहीट परेड देतो..... 

१९६९- इत्तेफाक, आराधना, दो रास्ते 

१९७०- बंधन, द ट्रेन, सच्चा झूठा, सफर, खामोशी 

१९७१- आन मिलो सजना, कटी पतंग, आनंद, अंदाज, हाथी मेरे साथी, मर्यादा 

१९७२- दुष्मन, अमर प्रेम, अपना देश, बावर्ची, शेहजादा 

१९७३- दाग, अनुराग, नमक हराम 

१९७४- अजनबी, आप की कसम, प्रेमनगर, आविष्कार, रोटी 

अक्षरशः १९६९-१९७४ या माणसाने अखिल भारतीय लोकांना वेड लावले, वय वर्षे ८-८० या सगळ्यांना, विशेषतः महिलांच्या गळ्यातील ताईत झाला राजेश. दक्षिण भारतातही त्याची लोकप्रियता विशेष उल्लेखनीय म्हटली पाहिजे कारण हिंदी फिल्म इंडस्ट्रीत आत्तापर्यंत कोणताच नायक हा दक्षिण भारतात पण इतका लोकप्रिय झाला नव्हता जितका राजेश खन्ना दक्षिण भारतात पण लोकप्रिय होत गेला , कारण त्याच्या व्यक्तीरेखा या प्रत्येकाला आपल्या घरातील वाटत. 

मुली त्याला रक्तानं प्रेमपत्र लिहायच्या, त्याच्या गाडीची धूळ कपाळाला लावायच्या, तेव्हा त्याच्या सारखी हेअरस्टाइल आणि कपडे लोक करत असत, त्याचा अंदाज मधील गाॅगल घातलेला फोटो तर खूपच गाजला, तेव्हा जन्म घेतलेल्या मुलांची नावं पण राजेश ठेवली गेली, हे इतकं न भूतो न भविष्यति असे यश कोणालाही मिळाले नव्हते, १९७३ मध्ये तो डिंपल कपाडिया शी विवाहबद्ध झाला,  पुढे काळ अॅक्शन पटाचा आला आणि अमिताभ बच्चन युगात राजेश झपाट्याने मागं पडला , १९७५ च्या पासून अमिताभ बच्चन युग सुरू झाले, पुढे राजेश खन्ना ने १९७९ च्या अमरदीप ने पुन्हा वापसी करुन, थोडीसी बेवफाई, रेड रोज, कुदरत ,दर्द, राजपूत, अवतार, अगर तुम ना होते, सौतन, मकसद, आज का एम एल ए राम अवतार , आखिर क्यो, अमृत सारखे चांगले सिनेमे दिले पण तरीही १९६९-१९७४ मधल्या राजेश खन्ना ची सर या नंतरच्या राजेश खन्ना ला नव्हती.

 पुढे १९९१ ला राजीव गांधी यांच्या विनंतीवरून तो राजकारणात प्रवेश करता झाला आणि पुढे पोटनिवडणुकीत खासदार पण झाला पण राजकारणात तो रमला नाही आणि पुन्हा सिनेमात आला तो ऋषी कपूरच्या आ अब लौट चले पण ही वापसी विशेष यशस्वी ठरली नाही, काही दूरदर्शन मालिका पण केल्या पण बात कुछ जमी नही आणि तो हळूहळू लाईम लाईट पासून दूर होत गेला, त्याच्या कारकिर्दीत किशोर कुमार, पंचमदा आणि आनंद बक्षी, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचा सिंहाचा वाटा आहे . १८ जुलै २०१२ ला या भारताच्या  पहिल्या वहिल्या  सुपरस्टारची इहलोकीची यात्रा जरी संपली असली तरीही आज त्याचा ७९ वा वाढदिवस आहे आणि जसा तो म्हणायचा त्या प्रमाणे 'मेरे फॅन्स कभी मुझे छोडके नही जा सकते' आणि हे अगदी खरय राजेश खन्ना नावाच्या गारुडानं जी सिने रसिकांना भुरळ घातली आहे मग तो त्याचा अभिनय असो वा त्याच्यावर चित्रीत झालेली तमाम सुंदर गाणी असोत याची सर कोणालाच नाही आजतागायत.... 


©️®️ अतुल श्रीनिवास तळाशीकर 

                  २९/१२/२०२१

Post a Comment

Previous Post Next Post