किमान दोन जागा आपल्याला मिळाव्यात ...आमदार प्रकाश आवाडे
प्रेस मीडिया वृत्तसेवा : मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार माजी आमदार अमल महाडिक यांना पाठिंबा दिलेल्या आमदार प्रकाश आवाडे यांनी जिल्हा बँकेच्या राजकारणात महाविकास आघाडी सोबत राहण्याचे मान्य केल्याचे समजते. तथापि किमान दोन जागा आपल्याला मिळाव्यात अशी अपेक्षाही त्यांनी आज आमदार पी. एन. पाटील व डॉ. विनय कोरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केली.
बँकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही निवडणूक बिनविरोध कशी करता येईल याबाबत अध्यक्ष ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, पी. एन, श्री.कोरे व खासदार संजय मंडलिक यांची बैठक जिल्हा बँकेत झाली होती. तीत आवाडे व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी पी.एन.-कोरे यांच्यावर सोपवली होती. काल (ता. २) आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने न झालेली ही बैठक आज पी. एन. यांच्या निवासस्थानी सायंकाळी झाली.
विकास संस्था गटातील किमान चार ते पाच तालुक्यात लढतीचे चित्र आहे. ज्याठिकाणी तुल्यबळ लढत नाही अशा तालुक्यात इतरांचे अर्ज मागे घेण्याबाबत चर्चा झाली. बँकेच्या निवडणुकीत आपण महाविकास आघाडीसोबत राहू असे आश्वासन आवाडे यांनी या बैठकीत दिले. विद्यमान संचालक मंडळाक इतर मागासवर्गीय गटातून आवाडे यांचे संचालक म्हणून विलास गाताडे कार्यरत आहेत. स्वतः आवाडे हेही पुन्हा बँकेत येण्यासाठी इच्छुक आहेत. गाताडे यांच्या जागेसह आणखी किमान एक जागा आपल्याला मिळावी अशी अपेक्षा या बैठकीत आवाडे यांनी व्यक्त केल्याचे समजते. यावर आताच काय शब्द देता येणार नाही अशी भुमिका कोरे-पी. एन. यांनी घेतली. अर्ज छाननीनंतर होणाऱ्या व्यापक बैठकीत यावर तोडगा काढण्याचे आश्वासन या दोघांनी आवाडे यांना दिले.