प्राणघातक हल्ला करून सहा जणांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी

एक महिला, ग्रामसेवकासह एकूण सात जणांना दहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

मुरलीधर कांबळे :

 कोल्हापूर : शेतजमिनीच्या वादातून कोतोली (ता. पन्हाळा) येथे लोखंडी गज, फावडे, काठ्यांनी प्राणघातक हल्ला करून सहा जणांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश (वर्ग-२) बी. डी. शेळके यांनी एक महिला, ग्रामसेवकासह एकूण सात जणांना दहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.सरकारी अभियोक्ता ॲड. मंजुषा बी. पाटील यांनी काम पाहिले.

ग्रामसेवक सुरेश संजय पाटील (वय-३३), भाऊ सागर पाटील (३६), वडील संजय केरबा पाटील (६१), अजित वसंत पाटील (२९), भाऊ विनायक पाटील (२६), वडील वसंत केरबा पाटील (५१), आई नकुशा उर्फ लक्ष्मी वसंत पाटील (४६ सर्व रा. कोतोली, ता. पन्हाळा) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.

खटल्याची पार्श्वभूमी अशी की, कोतोली येथे शेतजमिनीच्या कारणांवरून वसंत व केरबा पाटील या दोघा भावांचा गावातीलच नीलेश पाटील यांच्या घराण्याशी पूर्ववैमनस्याच्या वादातून हल्लेखोरांनी नीलेशसह सहाजणांना लोखंडी गज, फावडे, काठ्यांनी मारहाण केली. हल्ल्यात नीलेश जयसिंग पाटील, सुनीता जयसिंग पाटील, युवराज सर्जेराव पाटील, हौसाबाई सर्जेराव पाटील, बाजीराव श्रीपती पाटील, लक्ष्मी बाजीराव पाटील (सर्व रा. कोतोली) हे जखमी झाले. नीलेशनी याबाबतची तक्रार पन्हाळा पोलिसांत दिली.

खटल्यात सरकारी पक्षातर्फे १७ साक्षीदार तपासले. फिर्यादी नीलेश, युवराज, लक्ष्मी पाटील यांच्यासह सीपीआरसह खासगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. भक्कम पुरावा व सरकारी वकील मंजूषा पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपींना दहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने जादा कैद अशी शिक्षा सुनावली. प्रकरणाचा तपास पो.नि. यशवंत गवारे यांनी केला. पैरवी अधिकारी श्याम बुचडे तसेच शहाजी पाटील यांची मदत लाभली.

Post a Comment

Previous Post Next Post