नव्या ट्रॅकवर उमेदवारांना प्रात्यक्षिक करताना मोठा कस लागणार ..
प्रेस मीडिया वृत्तसेवा : मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयात आठ आकडा असलेल्या रस्त्यावरून वाहन चालवून दाखविल्यानंतरच उमेदवाराला पर्मनंट अर्थात कायम वाहन चालविण्याचा परवाना मिळत होता.आता मात्र, त्यात बदल करण्यात आला असून 'एच' आकाराच्या नव्या ट्रॅकवरून वाहन चालविणे बंधनकारक केले आहे. या नव्या ट्रॅकवर उमेदवारांना प्रात्यक्षिक करताना मोठा कस लागणार आहे.
गेले कित्येक वर्षे वाहन दुचाकी असो वा चारचाकी त्याचा वाहन चालविण्याचा कायम परवाना काढण्यापूर्वी आठ आकडा असलेल्या रस्त्यावरून वाहतुकीचे नियम पाळून, वाहन तेही मोटार वाहन निरीक्षकांसमोर चालवून दाखवणे गरजेचे होते. त्यात एखादी चूक झाली की तो उमेदवार त्या परीक्षेत अनुत्तीर्ण केला जात होता. ही पद्धत आता परिवहन आयुक्त कार्यालयाने कालबाह्य ठरवीत नवा ट्रॅक बनवण्याचे आदेश राज्यात सर्व दिले होते.
त्यानुसार कोल्हापुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातही एच आकाराचा ट्रॅक तयार करण्यात आला आहे. यामध्ये वाहन मागे घेणे आणि त्यानंतर पुढे नेणे हे मोठे जिकिरीचे आहे. त्यामुळे कायम वाहन चालविण्याचा परवाना काढणाऱ्या उमेदवारांचा कस लागणार आहे. याहीपुढे जाऊन वाहनचालकाची चूक मोटारवाहन निरीक्षकांच्या लक्षात आली नाही तर ती इलेक्ट्राॅनिक सेन्सरद्वारे थेट संगणकावर दिसणार आहे. तशी सोय या ट्रॅकवर करण्यात येत आहे. त्यामुळे नव्याने कायम वाहन चालविण्याचा परवाना (लायसेन्स) काढणाऱ्या उमेदवारांचा आता कस लागणार आहे.