शिवाजी विद्यापीठाच्या व्याख्यानमालेत प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन..
कोल्हापूर ता.१३ भारतीय स्वातंत्र्य आंदोलन हा जगातील स्वातंत्र्यलढ्याचा एक महत्त्वाचा लोकलढा होता. या ब्रिटिश साम्राज्यशाही विरोधी लढ्यात अनेकांनी हौतात्म्य पत्करले. हजारोनी सर्वस्वाचा होम केला. या लढ्यामध्ये मादाम कामा यांच्यापासून कॅप्टन लक्ष्मी सहगल यांच्यापर्यंत आणि कल्पना दत्त यांच्यापासून कमल दोंदे यांच्यापर्यंत हजारो महिलांनी सक्रिय सहभाग घेतला. हा देश स्वतंत्र केला. त्यातीलच एक धगधगता अंगार आणि स्वातंत्र कशासाठी ? कुणासाठी ? याबाबतच्या स्पष्ट भूमिकेने कार्यरत राहिलेल्या 'इंदूताई पाटणकर' म्हणजे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील एक महत्त्वाच्या क्रांतिकर्त्या कार्यकर्त्या ,नेत्याआहेत. त्यांचे प्रेरणादायी जीवनकार्य समजून घेऊन त्या पद्धतीने कृतिशील राहणे हीच त्यांना आदरांजली ठरेल असे प्रतिपादन समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस आणि ' प्रबोधन प्रकाशन ज्योती' मासिकाचे संपादक प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते शिवाजी विद्यापीठाच्या कालवश श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासनाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफताना बोलत होते.भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, शिवाजी विद्यापीठाचा हिरक महोत्सव आणि कालवश शारदाबाई गोविंदराव पवार यांचा जन्मदिन यानिमित्ताने ' भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील स्त्रिया ' या विषयावर ही ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित केली आहे. त्यातील पहिले पुष्प ' इंदूताई पाटणकर ' या विषयावर प्रसाद कुलकर्णी यांनी गुंफले. श्रीमती शारदाबाई पवार अध्यासनाच्या समन्वयक प्रा. डॉ. भारती पाटील यांनी स्वागत, प्रास्ताविक केले.प्रा.डॉ.अवनिष पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले, इंदुताईच्या माहेरचे संपूर्ण निकम स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय होते.स्वातंत्र्याचे व समतेचे बाळकडू त्यांना घरीच मिळाले होते.त्यांच्या अंगभूत धाडसाला अभ्यासाची, वैचारिकतेची जोड मिळाली.काँग्रेस, समाजवादी,साम्यवादी चळवळीसह बुद्ध, मार्क्स,गांधी,आंबेडकर आदी विचारधारा त्यांनी जाणून घेतल्या.डाव्या,समाजवादी,साम्यवादी पुरोगामी व परिवर्तनवादी चळवळीशी त्यांनी अखेरपर्यंत जोडून घेतले व त्यांना सातत्यपूर्ण बळ दिले.प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या ओघवत्या शैलीतील भाषणामध्ये तत्कालिन व समकालीन सांदर्भासह इंदुताई पाटणकर यांचा संपूर्ण जीवनपट,क्रांतिवीर बाबूजी पाटणकर यांच्याबरोबरचे सहजीवन, सैद्धांतिक भूमिका, स्वातंत्र्य आंदोलनातील सक्रिय सहभाग तसेच स्वातंत्र्योत्तर काळात पुत्र डॉ.भारत पाटणकर व सून कालवश डॉ.गेल ऑमव्हेट यांच्यासह केलेले कार्य,श्रमिक मुक्ती दल, स्त्रीमुक्ती, शेतमजूर चळवळ,धरणग्रस्त चळवळ, बळीराजा धरण यासह शोषितांच्या वंचितांच्या उद्धारासाठी केलेले कार्य अधोरेखित केले.