प्रेस मीडिया वृत्तसेवा : मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : शहरात महापुराने बाधित झालेल्या क्षेत्रातील नागरिकांच्या जून-जुलै २०२१ या महिन्यातील पाणी बिलात ५० टक्के सवलत दिली आहे. या संदर्भातील ठराव आज प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मंजूर केला आहे शहरात अतिवृष्टी झाल्याने पंचगंगा नदी परिसरात तसेच शहरातील अन्य सखल भागामध्ये पुराचे पाणी आले होते. यामुळे परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी जाऊन नुकसान झाले. त्यामुळे महापालिकेने महापुरात बाधीत झालेल्या नागरिकांचे पाणी बिला मध्ये ५० टक्के सवलत देण्यासाठीची मागणी होती. त्यासाठी महापालिकेच्या वतीने महापुरामध्ये बाधित झालेल्या नागरिकांच्या घरी जाऊन महापालिकेकडील मीटर रिडर्सनी समक्ष सर्वेक्षण केले. त्यामध्ये तीन हजार सहाशे वीस नळ कनेक्शनधारक महापुरात बाधित झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांना या सवलतीचा लाभ होणार आहे.
लाभार्थी यादी संकेतस्थळावर
ज्या पूरबाधितांनी संबंधित महिन्यातील पाणी बिले भरली आहेत. त्यांच्या पुढील बिलातून संबंधित सवलतीची रक्कम कमी केली जाणार आहे. लाभार्थ्यांची नावे महापालिकेच्या www.kolhapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या यादीत अनावधानाने एखाद्या पूरग्रस्ताच्या नावाचा समावेश झाला नसेल तर त्यांनी लेखी अर्जासोबत पाणी बिल व शासकीय पंचनाम्याची छायांकीत प्रतीसह शहर पाणीपुरवठा कार्यालयात त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
लाभार्थी संख्या चालू पाणी बिल मागणी सांडपाणी अधिभार चालू बिल मागणी एकूण चालू मागणी पन्नास टक्के सवलत अशी
बाधित घरे ३,३४८ १४,३३,९७५ २,६०,४४० १६,९४,४२१ ८,४७,२१०.५०
बाधित गोठे २२ १३,३१६ २,८२८ १६,१४४ ८,७२,०००.००
बाधित दुकाने १५० ४३,६९४ १२,५६० ५६,२५४ २८,१२७.००
एकूण ३,६२० १४,९०,९८५ २,७५,८३४ १७,६६,८१९ ८,८३,४०९.५०