प्रेस मीडिया वृत्तसेवा : मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेने दिलेला स्वतंत्र लढण्याचा इशारा आणि मोठ्या संख्येने दाखल झालेले अर्ज यामुळे दोन दिवसांत अर्ज माघारीचे मोठे आव्हान सत्ताधारी गटाच्या नेत्यांसमोर असेल.(ता. १९) रात्री होणाऱ्या बैठकीत याचे चित्र स्पष्ट होणार असून, बिनविरोध करण्याच्या प्रक्रियेलाही खिळ बसण्याची शक्यता आहे.
विविध गटांतून तब्बल २७५ जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी गगनबावडा तालुका विकास संस्था गटाची निवडणूक यापूर्वीच बिनविरोध झाली आहे. चंदगड तालुका विकास संस्था गटातही दोनच अर्ज शिल्लक आहेत. केवळ आठ उमेदवारांनी विविध गटातून माघार घेतली आहे. सोमवार व मंगळवार असे दोनच दिवस माघारीसाठी शिल्लक आहेत. या दोन दिवसांत मोठ्या संख्येने अर्ज मागे घ्यावे लागतील. सोमवारी शिवसेनेचा निर्णय न झाल्यास सत्तारूढ गटांसमोर अर्ज मागे घेण्यासाठी अनेकांना विनंती करावी लागणार आहे.
विकास संस्था गटातील १२ व राखीव गटातील ९ अशा २१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. सत्तारूढ गटाच्या नेत्यांची बैठक काल झाली, पण त्यातही तोडगा निघाला नाही. विकास संस्था गटातील काही जागांची निवडणूक लागणारच आहे. राखीव गटातील जागा वाटपांचा फार्म्युलाही ठरलेला आहे. पण तो लगेच जाहीर केल्यास निर्माण होणारी बंडखोरी टाळण्यासाठी सोमवारीच पॅनेलची घोषणा करण्याचा निर्णय सत्तारूढ गटाच्या नेत्यांनी घेतला आहे.
श्रुतिका काटकर यांना उमेदवारीची मागणी
बाजार भोगाव : महिला प्रतिनिधी गटातून श्रुतिका शाहू काटकर यांना उमेदवारी देण्याची मागणी पन्हाळा तालुका काँग्रेसतर्फे केली. काँग्रेस कमिटी कार्यालयात काल झालेल्या ठरावधारकांच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी मते मांडली. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयसिंग हिर्डेकर, बाळासाहेब मोळे, ॲड.प्रबोध पाटील, सरपंच पांडुरंग काशीद, कृष्णात शिंदे,रावसाहेब पाटील, विलास पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातून काँग्रेसतर्फे महिला गटातून एकच अर्ज असल्यामुळे सौ. काटकर यांच्या उमेदवार मागणी होत आहे.