जयश्री जाधव यांना बिनविरोध निवडून आणणे, हीच खऱ्या अर्थाने आण्णांना श्रद्धांजली ठरेल'



प्रेस मीडिया वृत्तसेवा :  मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - 'दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांनी कोल्हापूरच्या विकासाचे पाहिलेले स्वप्न साकारणे आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना बिनविरोध निवडून आणणे, हीच खऱ्या अर्थाने आण्णांना श्रद्धांजली ठरेल'अशा भावना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केल्या.दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन केले होते. या शोकसभेत बोलताना अनेकांनी चंद्रकांत जाधव यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. आमदार चंद्रकांत जाधव यांनी शहरातील विविध विकासकामांना चालना दिली अशा भावना व्यक्त केल्या.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, 'भाजपने फार मोठ मन दाखवायला सुरुवात केली आहे. अलीकडच्या काही पोटनिवडणुकीत भाजपने काँग्रेसला बिनविरोध निवडणुकीसाठी मदत केली आहे. जयश्री जाधव यांना काँग्रेसने उमेदवारी द्यावी. त्यांना बिनविरोध निवडून आणू या तीच चंद्रकांत जाधव यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, 'विकासाची दृष्टी असलेला लोकप्रतिनिधी हरपला. त्यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी जे स्वप्नं पाहिले होते, त्या विकासासाठी प्रयत्न करू या.' माजी महापौर निलोफर आजरेकर म्हणाल्या, 'आमदार जाधव यांच्या स्मरणार्थ कोल्हापुरात ५०० आसन क्षमतेचे सभागृह बांधावे. नगरसेविका जयश्री जाधव यांनी महापालिकेत काम केले आहे. त्यांनी, चंद्रकांत जाधवांचे कार्य पुढे न्यावे. आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत.'

याप्रसंगी खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आवाडे, आमदार पी.एन. पाटील, आमदार राजू आवळे, आमदार जयंत आसगावकर, गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर, माजी उपमहापौर विक्रम जरग, माजी नगरसेवक बाबा पार्टे, काँग्रेसच्या महिला आघाडीच्या सरला पाटील, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव, भाजप महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, लालासाहेब गायकवाड यांनी आमदार जाधव यांना श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, माजी आमदार सुजित मिणचेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, माजी महापौर आर. के.पोवार, जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील, कॉम्रेड चंद्रकांत यादव, शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगले आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post