७५ लाख रुपयांची बेकायदेशीररित्या उधळपट्टी .
प्रेस मीडिया वृत्तसेवा : मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या शिवाजी पेठेतील भाड्याच्या कार्यालयाच्या नूतनीकरणावर ७५ लाख रुपयांची बेकादेशीररत्या उधळपट्टी करण्यात आली आहे, अंतिम बिल येणे अजून बाकी असून ही रक्कम ८७ लाख असल्याचे समितीच्या सूत्रांनी सांगितले.ताराबाई रोडवरील हक्काच्या जागेऐवजी कर्मचाऱ्यांनाही फिरता येत नाही अशा तोकड्या जागेवर एवढी मोठी रक्कम खर्च करताना न्याय व विधी खात्याची परवानगी घेतली नाही. याच रकमेत नवीन इमारतीचे बांधकाम झाले असते.
नूतनीकरण नेमके कशाचे..?
एल आकारातील हे कार्यालय बोळासारखे असून तेवढ्यातच मिटींग हॉल, अध्यक्ष, सचिव, सहसचिव, अकौंटंट, अभियंता यांच्या केबिन्स केल्या आहेत. कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेच्या डब्यासारखी व्यवस्था केली आहे. देवस्थानमधील कामांसाठी येणाऱ्या लोकांना बसण्यासाठी मात्र साधे बाकडे नाही अशा कार्यालयावर लाखो रुपये खर्च केले. त्याचवेळी एका पदाधिकाऱ्याच्या लॉजचे इंटिरिअरचे काम सुरू होते.
६३ लाख दिले..अंतिम बिल अजून नाहीच...
नूतनीकरणासाठी मार्च २०१९ मध्ये निविदा काढली, सर्वात कमी दर भरलेल्या ठेकेदाराला ५३ लाख १७ हजार १६५ रुपयांचे काम देण्यात आले त्यासाठी १२० दिवसांची मुदत दिली. कामे वाढवून ठेकेदाराला आजवर ६३ लाख रुपये करवीर निवासिनी फंडातून देण्यात आले. नगदी दप्तरी हुकूमानुसार १ फेब्रुवारी २०२० पर्यंत ७४ लाख रुपयांचे काम करण्यात आले. अंतिम बिल येणे असून ही रक्कम ८७ लाख असल्याचे समितीतून सांगण्यात आले.