प्रेस मीडिया वृत्तसेवा :
जयसिंगपूर ता. ७ ,राजकीय ,आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये महत्त्वापूर्ण स्थान आणि नियंत्रकाची भूमिका असली पाहिजे या भूमिकेतून जातीय उतरंडीत खालच्या स्थानावर ढकलल्या गेलेल्या वर्गाने चित्त्याप्रमाणे आक्रमक व्हावे. आपले न्याय्य सामाजिक हक्क मिळवून घ्यावेत या भूमिकेतून दलित पॅंथरची स्थापना झाली.पँथर ही व्यक्ती स्वातंत्र्य मिळवण्याची गर्जना होती. राजा ढाले,नामदेव ढसाळ,भाई संगारे आदी अनेकांनी पुढाकार घेऊन पँथर उभारली. बाबासाहेबांच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या संदेशाला सामाजिक उत्थानाच्या पातळीवर न्याय देण्याचा हा प्रयत्न होता.प्रारंभी प्रभावी असलेली पँथरची चळवळ आज काहीशी क्षीण झालेली आहे.मात्र पँथरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात समग्र दलित वर्गाचे प्रश्न आजही तीव्र आहेत हे वास्तव नाकारून चालणार नाही. अशावेळी समग्रतेचे भान देणारी बाबासाहेबांची समतेची भूमिका फार महत्त्वाची ठरते. त्या आधारावर कार्यरत राहणे हेच बाबासाहेबांना खरे अभिवादन ठरेल असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.ते समाजवादी प्रबोधिनीच्या जयसिंगपूर शाखेच्यावतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन आणि क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिन कार्यक्रमात बोलत होते.' पँथरची पन्नास वर्षे - स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्षे आणि डॉ. आंबेडकरांचे विचारधारा ' हा त्यांच्या मांडणीचा विषय होता. प्रारंभी डॉ.आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला प्राचार्य डॉ.राजेंद्र कुंभार व प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.डॉ.तुषार घाटगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
प्रसाद कुलकर्णी म्हणाले ,बाबासाहेबांच्या निधनानंतर रिपब्लिकन पक्ष दुभंगला. त्यातील एका गटाने पँथरची स्थापना केली.हे सर्व तरुण सुशिक्षित होते.अमेरिकेतील ब्लॅक पॅंथर,एडरीच क्लीव्हर, माल्कम एक्स ,रामस्वामी नायकर यांच्या चळवळीतून त्यांनी प्रेरणा घेतलेली होती.आरक्षणाने नोकऱ्या मिळाल्या पण सामाजिक व्यवहारात जात विसरली जात नाही. संविधानात अस्पृश्यांच्या उद्धारासाठी तरतुदी होत्या पण बहुतांश अस्पृश्य पददलीतच राहिले या भूमिकेतून पँथर उभी राहिली. प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या मांडणीत पँथरची पन्नास वर्षे ,स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव,आजचे वास्तव आणि त्याला भिडण्याची सामूहिक गरज याची सविस्तर मांडणी केली.
या कार्यक्रमाचा समारोप करताना प्राचार्य डॉ.राजेंद्र कुंभार म्हणाले पँथरचा जन्म ही केवळ राजकीय क्रांती नाही तर ती व्यवस्थेत हस्तक्षेप करणारी साहित्य -सांस्कृतिक क्रांती होती. सर्वांगीण परिवर्तन करायचे असेल तर साहित्य - कला- संस्कृती या आधारे होणाऱ्या चळवळी बळकट केल्या पाहिजेत.नवा तरुण वर्ग याच्याशी जोडून घ्यावा लागेल. आवळेकर हॉस्पिटलच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला डॉ.चिदानंद आवळेकर, डॉ. तुषार घाडगे, डॉ. सुनील बनसोडे, ऍड.संभाजीराव जाधव,एफ.वाय. कुंभोजकर ,ए.एस.पाटील, मदन कांबळे,ए.डी. सुतार, श्रीकांत सुतार ,जगन्नाथ कुडतुडकर,प्रा. कबीर कुंभार, दाऊद पटेल ,बाहुबली भनाजे आदी उपस्थित होते.