प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी / प्रतिनिधी
बेंगळुर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना होवूनही ही घटना क्षुल्लक असल्याची बेताल वक्तव्य करणाऱ्या कर्नाटक मुख्यमंत्री बोम्मई यांनी राजीनामा द्यावा, संबंधित समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी इचलकरंजीत आज मंगळवारी छत्रपती शासन महिला आघाडीच्यावतीने प्रांत कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला.हा मोर्चा प्रांत कार्यालयासमोर आल्यानंतर कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मार आंदोलन करण्यात आले. संतप्त महिलांनी कर्नाटक सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्याबरोबरच प्रांत कार्यालय, शिवतीर्थ परिसर दणाणून गेला होता. यावेळी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना मागणीचे निवेदन सादर केले. तसेच मुख्यमंत्री बोम्मई यांना बांगड्याचा आहेर पाठवण्याची मागणी करण्यात आली.
बेंगळुर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा काही समाजकंटकांकडून प्रकार घडला आहे. या घटनेचे मोठे पडसाद संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभागात उमटले आहेत. तसेच या घटनेतील संबंधित समाजकंटकांवर कर्नाटक राज्य सरकारकडून कायदेशीर कारवाई व्हावी ,या मागणीसाठी सामाजिक व हिंदुत्ववादी संघटनांकडून मोर्चे, निदर्शने करण्यात येत आहेत. असे असूनदेखील याबाबत कर्नाटक राज्य सरकारकडून कारवाईच्या हालचालीना गती नाही. त्यामुळे या सरकार विरोधात आता मोठी संतापाची भावना जनतेमध्ये उसळली आहे. याच अनुषंगाने इचलकरंजीत आज मंगळवारी छत्रपती शासन महिला आघाडीच्या वतीने सांगली रोडवरील कार्यालयापासून एल्गार मोर्चास सुरुवात झाली. मोर्चा मुख्य रस्त्यावरुन प्रांत कार्यालयासमोर काढण्यात आला.
यानंतर मोर्चा शिवतीर्थ येथे आणण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून अभिवादन करण्यात आले.
छत्रपती शासन महिला आघाडीच्या संस्थापक अध्यक्षा दिव्या मगदूम यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चात बिस्मिल्ला दानवाडे, राणी कोळी, जिजाताई कांबळे, सुनील कांबळे, विनोद नाईक, रेश्मा कांबळे, वैशाली मगदूम यांच्यासह महिला ,युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मोर्चाच्या मार्गावर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.