प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी / प्रतिनिधी
समाजातील सर्व प्रकारच्या समस्यांचा सामना करण्यासाठी अनेक प्रयोग अनेक संस्थांकडून केले जातात, परंतू समाजाच्या वेदना या संवेदना आहेत असे समजून सेवाभावी वृत्तीने समाजाचे काम करणाऱ्या सेवाभारतीसारख्या संस्था या कमीच आहेत असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी केले.
इचलकरंजी येथे सेवाभारती संचालित माधव विद्या मंदिरच्या नवीन इमारत लोकार्पण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सेवाभारतीचे अध्यक्ष भगतराम छाबडा ,रा. स्व. संघाचे कोल्हापूर जिल्हा संघचालक डॉ. सूर्यकिरण वाघ, तालुका संघचालक रमेश लाहोटी, माधव विद्या मंदिरच्या शालेय समितीचे अध्यक्ष पांडुरंग धोंडपुडे व मुख्याध्यापिका सौ. स्वाती शिंदे हे मान्यवर उपस्थित होते.
या वेळी भैय्याजी जोशी आपल्या भाषणात म्हणाले ,की सामाजिक बांधिलकी जपून तशी कृती करणारे अनेक दानशूर लोक समाजाप्रती आपले कर्तव्य बजावत असतात. सेवाभारती सारख्या संस्था त्यांचा अग्रक्रम असला पाहिजे, कारण त्या समाजाच्या संवेदना या आपल्या आहेत असे समजून काम करतात, परंतू हेही लक्षात ठेवले पाहिजे की, सेवाभारती ही एनजीओ नाही तर ती समाजाप्रती सेवा देण्यासाठी निर्माण केलेली एक व्यवस्था आहे. समाजाने समाजाप्रती निर्माण केलेली सामाजिक ऋण फेडण्यासाठीची ती एक प्रक्रिया आहे. कारण ज्यांनी आपले कर्तव्य समजून सेवाभारतीला देणगी दिली ती कोणत्या व्यक्तीला नव्हे तर सेवा वृत्तीने मनापासून काम करणाऱ्या व्यवस्थेला दिली आहे. त्यामुळेच ही व्यवस्थाच आज समाजात विश्वासाने काम करताना दिसते आहे. सामान्य माणसाला आज कमी दरात औषधोपचार मिळत नसताना सेवाभारतीसारख्या अनेक संस्था आज देशभरात उत्तम पद्धतीने आरोग्य सेवा देतात ,त्या केवळ सामाजिक सलोख्याच्या उद्देशाने. म्हणून एकीकडे दुर्गम भाग, एकीकडे वनवासी, जनजाती, एकीकडे दुर्लक्षित दिनदलित आहेत तर दुसरीकडे समाजाचा असा एक गट आहे जो मला समाजाप्रती काहीतरी करायचयं असे म्हणतो आहे, अशा दोहोंचा मिलाफ घडवून त्या दोहोतील दुवा होणे ही आजची गरज आहे व ते साध्य करण्यासाठी कार्यरत राहणे हेच आजचे उद्दीष्ट असले पाहिजे. त्यासाठी पराकोटीचा त्याग करण्यासाठी भावना आपण आपल्या मनात निर्माण करावी व मार्गक्रमण करावे असा सल्लाही त्यांनी दिला.
प्रारंभी माधव विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनीदेशभक्तीपर गीताचे सामूहिक गायन केले. नरेंद्र कुलकर्णी यांनी शाळेला मदत करणाऱ्या मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले. मुख्याध्यापिका सौ स्वाती शिंदे यांनी शाळेत वर्षभरात राबवल्या जाणाऱ्या उपक्रमाचे चित्रफितीद्वारे सुंदर विवेचन केले. कार्यक्रमाची सांगता शालेय समिती व शिक्षकांनी एकत्रित केलेल्या पसायदान गायनाने झाली.