मिर्झा गालिब हे प्रेमाची महती गाणारे आणि मानवी जीवनातील प्रेमाचे महत्त्व जाणणारे मोठे शायर होते
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी ता. २८ मिर्झा गालिब हे प्रेमाची महती गाणारे आणि मानवी जीवनातील प्रेमाचे महत्त्व जाणणारे मोठे शायर होते. उर्दूच्या या सार्वकालिक सर्वश्रेष्ठ शायराच्या जन्मदिनी ' ' 'गझल प्रेमऋतूची ' या मराठी गझल संग्रहाचे प्रकाशन होत आहे.तसेच गालिब यांच्या गझलांचे सादरीकरण होत आहे ही अतिशय अभिमानाची व काव्यमय बाब आहे.यामुळे भारतीय संस्कृतीच्या बहुविधतेचा व विशालतेचा वारसा जपणाऱ्या 'गंगा जमुनी तहजीबच्या परंपरेचा पदर आणखी तलम झाला आहे.यातूनच प्रेमाची पखरण करणारे खरे भारतीय सांस्कृतिक एकत्व पुन्हा अधोरेखित झाले असे मत ख्यातनाम उर्दू शायर मिर्झा गालिब यांच्या २२५ व्या जन्मवर्ष प्रारंभ दिना निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी व्यक्त केले.
'जीनियस ऑफ गालिब ग्रुपच्या वतीने ज्येष्ठ मराठी गझलकार प्रसाद कुलकर्णी आणि गझलनंदा उर्फ प्रा. सुनंदा पाटील यांच्या ' गझल प्रेमऋतूची 'या गझल संग्रहाचे प्रकाशन आणि गौरी पाटील, सागर बेळगामी, वृषाली कुलकर्णी, डॉ.यदुराज प्रसादे यांची गझल गायन मैफल अशा दोन सत्रातील कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान इचलकरंजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी भूषवले. तर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ फिजिशियन डॉ.एम.एस. बोरगावे आणि ज्येष्ठ गायक शब्बीर सोलापुरे होते.प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते मिर्झा गालिब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच दीपप्रज्वलन करण्यात आले.ज्येष्ठ शायर इरफान शाहनूरी यांनी सर्व मान्यवर व उपस्थितांचे स्वागत केले. जिनियस ऑफ गालिब ग्रुपचे प्रमुख संतोष साधले यांनी प्रास्ताविक केले.त्यातून या कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका मांडली. प्रसाद कुलकर्णी यांनी 'गझल प्रेमऋतूची ' या संग्रहाचे अंतरंग उलगडून दाखवले तसेच गझल लेखनाचा प्रवास मांडला. गझलनंदा उर्फ प्रा.सुनंदा पाटील यांनी ऑनलाइन पद्धतीने मनोगत व्यक्त केले.यावेळी सर्वच मान्यवर पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून मिर्झा गालिब यांची शायरी आणि ' गझल प्रेमऋतूची 'यावर भाष्य केले. या पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन ख्यातनाम कवी व निवेदक साहिल कबीर यांनी अतिशय प्रभावीपणे केले.
दुसऱ्या सत्रामध्ये प्रसिद्ध गायिका व अभिनेत्री गौरी पाटील ( इचलकरंजी ) यांनी मिर्झा गालिब यांच्या हर इक बात पे कहते हो की तुम क्या हो,अर्जे नियाजे इष्क के कबिल नही रहा,ये न थी हमारी किस्मत की विसाले यार होता या गझलांचे सादरीकरण केले तर ज्येष्ठ शायर व गायक सागर बेलगामी (बेळगाव )दिले नादान तुझे हुवा क्या है , हजारो खाईश ऐसें की हर खाईश पर दम निकले या गझला सादर केल्या. ज्येष्ठ शास्त्रीय व सुगम संगीत गायिका वृषाली कुलकर्णी (पुणे) यांनी मिर्झा गालिब, गझलनंदाआणि प्रसाद कुलकर्णी यांच्या अनुक्रमे आह को चाहीये एक उमर असर होने तक,माझ्या तुझ्या मनाच्या जुळल्या सुरेल तारा,अंतरीचे भाव माझ्या शेवटी ओठात आले या गझला पेश केल्या.आणि
डॉ.यदुराज प्रसादे ( जयसिंगपूर ) यांनी 'है बस के हर एक उनके इशारे हे गालिब यांची गझल सादर केली या संपूर्ण मैफलीला गौरी पाटील यांनी हार्मोनियम आणि जितेंद्र कुलकर्णी यांनी तबला साथ अतिशय उत्तम पद्धतीने केली. या गझल मैफलीचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शायर इरफान शाहनूरी यांनी अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने करत करत मिर्झा गालिब यांचे व्यक्तिमत्व व विचारपरिचय घडविला. या कार्यक्रमाला इचलकरंजी आणि परिसरातील जाणकार व दर्दी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसाद कुलकर्णी यांनी आभार व्यक्त केले
फोटो: जीनियस ऑफ गालिबच्या वतीने ' गझल प्रेमऋतूची ' या गझल संग्रहाचे प्रकाशन करताना डॉ. प्रदीप ठेंगल, डॉ.एम.ए. बोरगावे, शब्बीर सोलापूर आणि इतर मान्यवर