शिवनाकवाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी / प्रतिनिधी

अवघ्या नऊ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या शिवनाकवाडी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नेतेमंडळींनी आतापासूनच उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.

त्यात एकहाती सत्ता मिळवण्याच्या उद्देशाने निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. शिवनाकवाडी ग्रामपंचायतीवर सध्या भाजप व स्वाभिमानी शेतकरी संघटना पुरस्कृत आघाडीची सत्ता आहे. ही सत्ता अबाधित राहणार की सत्तापालट होणार यासाठी २०२२ ची ग्रामपंचायत निवडणूक जवळ येवून ठेपली आहे. त्यामुळे राजकीय आशा - आकांक्षा व सत्तेसाठी इच्छुकांनी आत्ता पासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून प्रभागात आपली छाप पाडण्यासाठी मोठी चढाओढ सुरु ठेवल्याचे दिसत आहे.

यंदाच्या ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत युवा वर्ग राजकीय आशा - आकांक्षा व सत्तेसाठी मोठ्या संख्येने उतरण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळेआत्ता पासूनच व्हाटसअप, फेसबुक अशा विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात येण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत.तसेच गावातील कोणताही कार्यक्रम असो, सुखदुःखांचा प्रसंग असो किंवा सामाजिक व धार्मिक कार्यक्रम अशा कार्यक्रमांना आवर्जून उपस्थिती लावत आहेत.

शिरोळ तालुक्यात राजकीय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या

शिवनाकवाडी ग्रामपंचायतमध्ये यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सरपंचपदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्ग असे आरक्षण जाहिर झाले आहे. त्यामुळे साहजिकच यंदा सरपंचपदासाठी महिला वर्गास संधी मिळणार आहे.त्यामुळे आपलाच उमेदवार या पदाच्या खुर्चीवर विराजमान व्हावा ,यासाठीसर्वच नेतेमंडळीं कडून सक्षम अशा महिला उमेदवारांची  शोधाशोध करण्यात येत आहे.

यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून जोरात मोर्चेबांधणी सुरु असून मागील वेळी झालेल्या चुका सुधारून यंदा कायपण होऊ दे सत्ता घ्यायचीच ,या निर्धाराने नेतेमंडळी विविध क्लुप्त्या लढवत कामाला लागली आहे.त्यात राजकीय व्यूहरचना आखून पडद्यामागच्या घडामोडींना वेग देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा लवकरच कार्यान्वित होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

यापूर्वी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत  जनतेतून सरपंच निवडला जात होता. पण यंदाच्या निवडणुकीतराज्यातील महाविकास आघाडी सरकारने ग्रामपंचायत सदस्यांच्या बहुमताच्या जोरावर गटातूनच सरपंच निवडला जावा असा अध्यादेश काढला आहे. त्यामुळे आता साहजिकच स्थानिक पातळीवरच्या गटातटाला पुन्हा महत्व प्राप्त झाले आहे.त्यातच शिवनाकवाडी ग्रामपंचायतीत महिला लर्गास सरपंच मिळणार असून त्यांच्या पतीदेवांनी आपलीच बायको सरपंच कशी होईल ,यासाठी आतापासूनच तयारी सुरु ठेवली आहे.

यंदाच्या निवडणुकीत कोणत्या  महिलेची सरपंचपदी वर्णी लागणार याची उत्सुकता आतापासूनच शिगेला पोहचली आहे.जो तो आपल्या परीने नेतेमंडळींची मनधरणी करत आणि वार्डावार्डात फेरी मारत मतदारांशी संपर्क साधत आहेत.मागील निवडणुकीपेक्षा यंदाची निवडणूक म्हणावी तशी कोणत्याच पक्षाला सोपी जाणार नाही. त्यामुळे नेतेमंडळींसह रिंगणातील उमेदवारांना सत्ता मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

एकंदरीत ,गावागावांत , पारकट्टयावर या पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकीची खुमासदार चर्चा सुरू असून आतापासूनच सर्वच पक्षांबरोबरच गटातटाने मोठी कंबर कसली असल्याचे दिसत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post